

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहरासह उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून, संतप्त नागरिकांनी मनपा आयुक्तांना घेराव घालण्यास सुरुवात केली आहे.
मुकुंदनगर परिसरातील प्रभाग क्र.3 मध्ये पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, त्यामुळे नगारिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.
या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी नगरसेवक आसिफ सुलतान यांच्या नेतृत्वाखाली मनपा आयुक्त शंकर गोरे यांना घेराव घालण्यात आला. पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास मनपावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
आयुक्त गोरे यांना नगरसेवक आसिफ सुलतान यांनी निवेदन दिले.
यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, अनिस चुडीवाला, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, इम्रान बागवान, समीना शेख, रेशमा खान, शाहीन खान, सादिया सय्यद आदींसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुकुंदनगर ते दर्गा दायरा व अलमास पार्क ते राज नगरमधील नशेमन कॉलनी, जीशान कॉलनी, तरन्नुम कॉलनी, इशरत पार्क, मेहराज मस्जिद परिसर, एन.एम.गार्डन, सहारा सिटी, नम्रता कॉलनी, बजाज कॉलनी, दरबार कॉलनी, हुसेनीया कॉलनी, अमन कॉलनी, अमर कॉम्प्लेक्स, शहाशरीफ पार्क, राज नगर, दगडी चाल, संजोग नगर, मिलन कॉलनी, राजकोट चाल, अल्पना चाल, अभिलाषा कॉलनी, हिना पार्क, बिहारी चाल, हमीद पार्क, शहाजी नगर, क्लासिक कॉलनी, मोठी मरियम मस्जिद परिसर, इक्रा शाळा परिसर, दत्त मंदिर परिसर व इतर भागातपाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.
हा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नगरसेवक आसिफ सुलतान यांनी वेळोवेळी पत्रव्यवहार व आंदोलने केली आहेत. परंतु, अद्यापही पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे नागरिकांच्या रोषास लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागते. येत्या 10 दिवसात प्रभागातील पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात यावी. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता प्रभागातील नागरिकांसमवेत मनपा कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
नगर शहरातील प्रभाग चारमधील सुमारे चारशे घरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणी प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी करीत नागरिकांनी बुधवारी (दि. 15) महापालिकेत आयुक्तांना घेराव घातला. दरम्यान, येत्या आठ दिवसांत पाणीप्रश्न सुटल्यास डीएसपी चौकात रास्तारोको करण्याचा इशारा दिला.
शहरातील प्रभाग चारमधील सिव्हिल हडको, मिस्किन नगर, एलआयसी कॉलनी, चैतन्य नगर, मॉर्डन कॉलनी, प्रकाशपूर, गुलमोहर रोड परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वेळेवर भरूनही पुरेसे पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी बुधवारी नगरसेवक योगीराज गाडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्तांना घेराव घातला व पाणी प्रश्नाचे निवेदन दिले.