करंजी, पुढारी वृत्तसेवा : मागील अडीच वर्षांच्या कार्यकाळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यावेळी वाडी, वस्तींवरील शेतकर्यांना नियमित सिंगल फेजद्वारे वीजपुरवठा करण्यात येत होता; त्यावेळी कधीही प्रश्न निर्माण झाला नाही. सत्ता बदलताच गेल्या महिनाभरापासून ग्रामीण परिसरातील सिंगल फेज बंद करण्यात आले असून, वीज पुरवठाही वारंवार खंडित होत आहे. शेतकर्यांना व गावठाणलाही विजेचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे.
विजेच्या प्रश्नाकडे नव्याने स्थापन झालेल्या सरकारचे बिलकुल लक्ष नाही. ज्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यावेळी भाजपने शेतकर्यांना वीजबिल भरू नका, असे सांगितले होते. पुन्हा भाजपचे सरकार येताच विजेचा प्रश्न गंभीर बनला असून, ट्रान्सफार्मरचे प्रश्न पुढे येत आहेत. वाडीवस्तींवर कुठेही पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो. सिंगल फेज ही बंद करण्यात आली. त्यामुळे वाडी-वस्तींवरील लोक रात्री अंधारात चाचपडत आहेत. याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी (दि. 31) सकाळी नऊ वाजता मिरी सबस्टेशनवर शेतकर्यांसह धडक मोर्चा काढणार असल्याचे, माजी ऊर्जामंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले आहे.