

नगर, पुढारी वृत्तसेवा : राज्यात टीईटी परीक्षेत वशिल्याने पास झालेल्या 'त्या' 7800 शिक्षकांची यादी अखेर समोर आली आहे. त्यात नगर जिल्ह्यातील कोणी शिक्षक आहेत का, असतील, तर ते कोण?, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी नगर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकार्यांनाही संबंधित यादी पाठविल्याची माहिती सूत्रांकडून समजली.
2018-2019 या कालावधीत टीईटी परीक्षा घोटाळा झाला होता. पुणे सायबर क्राईमकडून त्याचा तपास सुरू होता. त्यात नगर जिल्ह्यातील प्राथमिकचे आठ, माध्यमिकचे 49 आणि खासगी शाळांमधील 29 शिक्षकांचे 31 अशाप्रकारे 88 प्रमाणपत्र पडताळणीसाठी पाठविले होते. या व्यतिरिक्त अजूनही काही संशयित शिक्षकांची प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने मागवून घेतल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे पोलिस तपासात जिल्ह्यातील किती शिक्षक वशिल्याने पास झाले, हे चित्र स्पष्ट करणार्या 'त्या' अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. आता चार दिवसांपूर्वी ही यादी बाहेर आली आहे.
पोलिस तपासानंतर परीक्षा परिषदेने संबंधित घोटाळ्यातील परीक्षार्थींच्या संपादणुका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच यापुढे टीईटी परीक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधही घालण्याचा निर्णय घेतल्याचे समजले आहे. संबंधित 7800 शिक्षकांच्या नावाची यादी परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकार्यांना पाठविण्यात आली आहे. मात्र, शिक्षणाधिकार्यांना वेळ न मिळाल्याने त्यांनी ही यादी अद्याप पाहिलेली नाही. त्यांनी यादी पडताळणीची जबाबदारी एका कर्मचार्याकडे सोपविली असून, त्यांनाही वेळ न मिळाल्याने या यादीत नगरचे कोणी शिक्षक आहेत का, हे अद्याप समजू शकलेले नाही.
टीईटी घोटाळा प्रकरणातील यादी आलेली आहे. कर्मचार्याला ती पडताळणी करण्यासाठी सूचना केलेल्या आहेत. यादी मोठी असल्याने यामध्ये जिल्ह्यातील किती शिक्षकांची नावे आहेत, किंवा नाही, हे अद्याप समजू शकले नाही.
भास्कर पाटील, शिक्षणाधिकारी, प्रा. जि. प.