नगर : रोहित्राला चिकटून शेतकर्‍याचा मृत्यू

नगर : रोहित्राला चिकटून शेतकर्‍याचा मृत्यू
Published on
Updated on

बोधेगाव, पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील दिवटे येथील तरुण शेतकर्‍याचा विद्युत रोहित्राला चिकटून जागीच मृत्यू झाला. शिवदास शंकर कणसे (वय 30) असे या शेतकर्‍याचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बोधेगाव आणि परिसरात संततधार रिमझिम पाऊस सुरू आहे. बुधवारी (दि.13) सायंकाळी सातच्या दरम्यान पावसाने काही वेळ उघडीप दिली होती. त्यामुळे शिवदास कणसे आणि आणखी दोनतीन शेतकरी गावलगत फेर फटका मारण्यासाठी बाहेर पडले होते.गावातील हातपंपाजवळ गावठाणला वीजपुरवठा करणार्‍या रोहित्राजवळून जात असताना शिवदास कणसे त्याकडे ओढले गेले आणि त्यास चिकटले. सोबत असलेल्या शेतकर्‍यांनी तात्काळ बालमटाकळी येथील वीज उपकेंद्राला फोन केल्यानंतर, तेव्हा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर शिवदास कणसे यांना प्रथम बोधेगाव आणि नंतर शेवगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, शेवगाव येथील डॉक्टरांनी कणसे यांना मृत घोषित केले.

बालमटाकळी उपकेंद्र अंतर्गत प्रत्येक गावात गावठाणसाठी एकापेक्षा जास्त रोहित्र आहेत. एका रोहित्रावरील वीज खंडित झाल्यास लोक भर पावसात रात्री बेरात्री दुसर्‍या रोहित्रावरील तारांवर आकडे टाकतात. त्यामुळे बंद असलेल्या रोहित्रात परतीचा वीजप्रवाह येतो आणि रोहित्राचे जंप तुटतात. त्याच्या तारा रोहित्राला लागतात. त्यामुळे रोहित्र बसविलेल्या खांबावर आणि फ्यूज असलेल्या पेटीमध्ये प्रवाह उतरतो. सतत पाऊस पडत असल्याने जमिनीतही वीजप्रवाह उतरतो. खाली चिखल आणि पाणी असल्याने प्रचंड आर्थिंग मिळते. त्यामुळे दिवटे येथील शेतकर्‍याचा मृत्यु झाला असावा असा अंदाज महावितरणचे उप अभियंता पंकज मेहता यांनी वर्तविला आहे. लोक भर पावसात आकडे टाकतात. त्यामुळे जीवावर बेतणार्‍या घटना घडतात. त्यामुळे आकडे टाकू नयेत, असे आवाहन मेहता यांनी केले आहे.

मृताच्या नातेवाईकांना मदत

दरम्यान, घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेत त्यांनी ती नगर येथील विद्युत निरिक्षकांना कळविली आहे. मृत शेतकर्‍यांच्या नातेवाईकांना येत्या दोन दिवसांत तातडीची मदत मिळेल. तसेच, सदर घटनेचा सविस्तर अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय्य मिळण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे मेहता यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news