

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोरून एका सेवानिवृत्त मुख्याध्यापकाची दोन लक्ष रुपयांची रक्कम चोरीचा प्रकार घडल्याची घटना ताजी असतानाच बाजार समितीमधील आडत व्यापार्याची दोन लाख 40 हजार रुपयांची रक्कम लुटल्याची घटना नुकतीच घडली आहे.
नगर जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या राहुरी परिसरामध्ये काही दिवसांपासून गुन्हेगारांनी थैमान घातलेले आहे. महिलांसह अल्पवयीन तरूणींवर अत्याचार, विनयभंग, अपहरण प्रकार घडतच असताना दुकानफोडी, घरफोडीच्या घटना सातत्याने घडतच होत्या. त्यानंतर बँकेतील पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्याकडील पैशांची लुटमार करणारी टोळी राहुरीत सक्रिय झालेली आहे.
2 जुलै रोजी दुपारी 12 च्या सुमारास सेवानिवृत्त मुख्याध्यापक मिस्तरी यांच्याकडील दोन लाखांची रक्कम चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास लावण्यात पोलिस अपयशी ठरत असतानाच अॅक्सिस बँकेतून पैसे काढणार्या दोघांच्या हातातून दोन लाख चाळीस हजारांची रक्कम लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापारी चेतन भिंगारकर यांनी दि. 5 जुलै रोजी दुपारच्या वेळी मॅनेजर वैभव लक्ष्मण तनपुरे व अनिकेत रमेश गुंजाळ यांना अॅक्सिस बँकेतून रक्कम काढण्यासाठी पाठविले होते. राहुरी खुर्द येथील अॅक्सिस बँकेतून पैसे काढल्यानंतर दोघे जण दुचाकीवर बसून बाजार समितीकडे निघाले होते. त्याचवेळी दोघा भामट्यांनी संबंधितांवर पाळत ठेवत पाठलाग केला. दुचाकीवर हेल्मेट घातलेल्या दोघांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवर पाठीमागून भरधाव वेगाने येत तनपुरे व गुंजाळ यांच्याकडे असलेली पैशाची पिशवी ओढून घेतली. पिशवी ताब्यात येताच दोघांनी तीव्र वेगाने दुचाकी चालवित राहुरी फॅक्टरीच्या दिशेने निघून गेले. घटनेचा तपास सुरू आहे.