

राशीन, पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील राशीन येथे मंगळवारी भर पावसामध्ये दौंड-उस्मानाबाद रस्त्यावर तसेच श्री जगदंबा देवी मंदिर रोड, मराठी शाळेसमोरील रस्त्यावर भाजीविक्रेते, किराणा मालाचे विक्रेते यांना पावसामुळे दलदलीतच बसण्याची वेळ आली.
सकाळी पाऊस नसल्यामुळे दुकाने चांगली थाटली होती. परंतु अचानक दिवसभर झालेल्या पावसामुळे सर्व दुकाने तसेच भाजी विक्री ते स्टॉल पाण्यामध्ये गेल्यामुळे चिखलमय झाले होते. ठिकठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे नागरिकांना देखील चिखल तुडवत, पाण्यामधून मार्ग काढत व छत्रीचा सहारा घेत भाजीपाला खरेदी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. मंगळवार हा राशीनचा आठवडे बाजार दिवस असतो. या दिवशी शेळी, मेंढी, गाई, बैल बाजारामध्येही पावसामुळे परिणाम झाल्याचे दिसून आले.
बाजारात पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली या ठिकाणाहून येणारे व्यापारी व ग्राहकांची संख्याही कमी झाल्याचे दिसून आले. तसेच आठवडे बाजारामध्ये पाण्यामुळे भाजीपाला सडल्याने विक्रेत्यांनी रस्त्यावरच भाजीपाला टाकून दिला. त्यामुळे मंगळवारचा आठवडे बाजार पावसानेच गाजवल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान, याप्रकरणी स्थानिक प्रशासनाने बाजारकरूंची योग्य ती सुविधा करावी, अशी मागणी पुढे येताना दिसत आहे.
भाजीपाला विक्रेत्यांनी सकाळी साडेआठ वाजता लिलावामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी केला होता . परंतु दिवसभर पावसाच्या सरी चालू राहिल्याने भाजीपाला तोट्यामध्येच विकण्याची वेळ विक्रेत्यांवर आली.
– शिवाजी काळे, भाजीविक्रेते