नगर : रानडुकरांच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

नगर : रानडुकरांच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील जेऊर येथे रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. 14) रात्री घडली. जेऊर परिसरातील बेल्हेकर वस्ती येथे रानडुकराच्या हल्ल्यात मनोज अजमुद्दीन इनामदार (वय 45) हे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री दहाच्या सुमारास आंब्याच्या बागेत कुत्री भुंकत असल्याने इनामदार तेथे गेले होते.

त्यावेळी अचानक रानडुकरांनी हल्ला केला. त्यांना खाली पाडून चावे घेत जबर जखमी केले. इनामदार यांच्या कुत्र्यांनी प्रतिकार करून डुकरांना पिटाळून लावले. कुत्र्यांमुळेच प्राण वाचल्याचे इनामदार यांनी सांगितले. उपवन संरक्षक सुवर्णा माने, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक मनेष जाधव यांनी इनामदार यांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

गर्भगिरीच्या डोंगररांगांमध्ये रानडुकरांची मोठी संख्या आहे. बुद्धपौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात वनविभागाने केलेल्या पाहणीत ही बाब निदर्शनास आली आहे. शेतकरी, नागरीक, लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

मिरच्यांच्या धुराचा प्रयोग यशस्वी
रानडुकरांपासून पिके व स्व संरक्षणासाठी बांधावर पाईपला पोते बांधावे. त्यावर डिझेल व मिरची पावडर टाकून धूर करावा. सलून दुकानातील केस बांधावर जाळल्यानेदेखील रानडुक्कर येत नसल्याचा प्रयोग बर्‍याच ठिकाणी यशस्वी झाला आहे. शेतकर्‍यांनी हा प्रयोग करावा, असे आवाहन वनरक्षक मनेष जाधव यांनी केले.

बंदोबस्त करण्याबाबत ग्रामसभेत ठराव
जेऊर परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढत चालला आहे. डोंगररांगांत मोठ्या प्रमाणात रानडुकरे आहेत. ती पिकांचे, तसेच ठिबक सिंचन पाईप व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. या रानडुकरांचा बंदोबस्त करण्याबाबत जेऊर ग्रामसभेत ठराव देखील घेण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news