नगर, शशिकांत पवार : जिल्ह्यातील संगमनेर, राहाता, राहुरी आणि नगर तालुक्यातून जाणार्या सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गासाठी संपादीत जमिनीचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. संपादीत जमिनीच्या मोबदल्यासोबतच वाढीव पैसे मिळावेत यासाठी जमिनीत रात्रीतून झाडे उगवण्याचा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अधिकार्यांच्या सल्ल्यानेच हा साक्षात्कार होत असल्याची माहिती 'पुढारी'च्या हाती आली आहे. महसूल, कृषी विभागातील अधिकारी वाढीव मुल्यांकनात टक्केवारी मागत असल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे गेल्यानंतर त्याची चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सूरत-चेन्नई हा प्रस्तावित ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गा नगर जिल्ह्यातील चार तालुक्यातून जाणार आहे. त्यासाठी भूसंपादन करावयाच्या जमिनीचे मोजमाप नगर तालुक्यात सुरू आहे. ही मोजणी करताना अधिकार्यांनी शेतकर्यांशी साटेलोटे केल्याची माहिती हाती आली आहे. शेतकर्यांना त्यांच्या जमिनीचे, झाडांचे, इमारतीचा योग्य तो मोबदला मिळालाच पाहिजे याबाबत कोणाचे दुमत नाही. परंतु शेतकर्यांचे मूल्यांकन करताना जे अधिकारी 'चरत' आहेत त्यांच्यावर अंकुश राहणे गरजेचे आहे. मूल्यांकन ठरविण्यासाठी 'चिरीमिरी' द्यावी लागत असून त्यामध्ये विविध खात्यांच्या अधिकार्यांचे हात बरबटल्याची चर्चा गावोगावी सुरू आहे. याची वरिष्ठ पातळीवरून चौकशी होण्याची गरज आहे.
मुल्यांकन वाढीसाठी मोठी झाडे आणा, अन् शेतात लावा. मोजणीत त्याची नोंद घेवू असे सांगत अधिकारी मुल्यांकन वाढीच्या रक्कमेत वाटेकरी होत असल्याची माहिती आहे. त्यासंदर्भातील तक्रार विभागीय आयुक्तांकडे गेल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांची बैठक घेतली. विभागीय आयुक्तांना चौकशी अहवाल सादर केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑगस्टअखेरीस ही मोजणी पूर्ण होऊन, त्यानंतर थ्रीडी आणि पुढे प्रत्यक्षात भरपाई वाटप आणि हस्तांतरण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दरम्यान, मोजणीनंतर किती शेतकर्यांची, किती जमीन व कोणत्या दराने भूसंपादित केली जाणार, हे निश्चित होणार आहे. त्यापूर्वीच 'टक्केवारी'साठी अधिकार्यांनी शेतकर्यांशी साटेलोटे केल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली.
केंद्र सरकारने 2019 मध्ये बहुचर्चित सूरत-चेन्नई या ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली होती. संगमनेर, राहाता, राहुरी आणि नगर तालुक्यातून हा मार्ग जाणार आहे. महसूल विभागाने संपादित करायच्या क्षेत्राचा आराखडा तयार करून हरकती मागाविल्या होत्या. त्यावरील सुनावणी पूर्ण झाली.आता प्रत्यक्षात भूसंपादित केल्या जाणार्या क्षेत्राच्या मोजणीला सुरुवात झाली आहे.
मोजणीनंतरच भूसंपादनाचे क्षेत्र, मूळ मालकांची माहिती पुढे येईल. त्यानंतर दुय्यम निबंधकांकडून त्या-त्या भागातील रेडीरेकनरचा अहवाल मागविला जाईल. भूसंपादन क्षेत्रात घरे असतील तर सार्वजनिक बांधकाम विभाग, झाडे असतील कृषी विभाग, पाईपलाईन असेल तर एमजीपी आणि विहिरी, बोअरवेल्स असेल तर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून मूल्यांकन काढले जाणार आहे. दुय्यम निबंधकांचा अहवाल आणि मूल्यांकन अहवाल एकत्रित करून त्यानुसार भरपाई दिली जाणार आहे. त्यासाठी सुमारे 1 हजार 20 कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.
सूरत-हैद्राबाद महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर नगरमध्येही विकासाचे वारे वाहू लागणार आहे. आयटी पार्क, नवीन उद्योगधंदे, पर्यटन वाढीसाठी संधी उपलब्ध होणार आहे. सुरतमार्गे नगर ते दिल्ली अंतर 12 तासात अंतर कापले जाणार आहे. तसेच, नगर ते चेन्नई प्रवासाचा टप्पा अवघ्या सात तासात पार पाडता येणार आहे. सूरत ते शिर्डी अंतर सव्वा दोन तासांत पार होणे शक्य आहे.
संगमनेर-चिंचोली गुरव, अजमपूर, औंरगपूर, तळेगाव, हसनाबाद, जुनेगाव, वडझरी खुर्द, वडझरी बुद्रुक, कसारे, लोहारे, मिरपूर, चिंचपूरसह 13 गावांमधील जमिनीची मोजणी पूर्ण.
राहाता- गोगलगाव, चंद्रपूर, हसनापूर, दुर्गापूर, हनुमंतगाव शिवारातून जाणार हायवे. 8.930 किमी रस्ता मोजणीची प्रक्रिया पूर्ण.
राहुरी- धानोरे, सोनगाव, माळेवाडी डुक्रेवारी, कानडगाव, तांदूळनेर, तांभेरे, वडनेर, कणगर, कणगर बु., चिंचविहिरे, मल्हारवाडी,मोमीन आखाडा, राहुरी बुद्रुक, राहुरी खुर्द, डिग्रस, सडे, खडांबे बु., खडांबे खुर्द, वांबोरी या गावांतील जमिनीचे अधिग्रहण केले जाणार आहे.
नगर तालुका- मांजरसुंभा, पिंपळगाव माळवी, शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव उज्जैनी, कापूरवाडी, भिंगार, शहापूर, सारोळाबद्धी, कोल्हेवाडी, धनगरवाडी, बारदरी या गावातून साधारणतः 23.050 कि.मी रस्ता जाईल. मोजणी अंतिम टप्प्यात.
(अंतर किमीमध्ये)