

नगर, : पुढारीवृत्तसेवा : दुकानाकडे जाणार्या रस्त्याच्या वादातून दोन भावांना बेदम मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली.
वाजिद सलिम काझी, बसिर सलिम काझी (दोघे रा. गोंविदपुरा) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी वाजिद काझी यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून इकबाल आयुब खान ऊर्फ मुन्ना भंगारवाले, फिरोज इजाज राठोड, अश्पाक इकबाल खान, सोन्या इकबाल खान (सर्व रा. लालटाकी) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा भंगारचा व्यवसाय आहे. त्यांच्या दुकानाकडे जाण्यासाठी इकबाल खान याच्या दुकानासमोरून रस्ता आहे. दरम्यान, फिर्यादी यांच्या दुकानाकडे सोमवारी भंगारचा टेम्पो आला होता. यावेळी इकबाल याने रस्त्यावर भंगारचे साहित्य टाकले होते. यावरून फिर्यादी व गुन्हा दाखल झालेल्या चौघांचा वाद झाला. या वादात चौघांनी फिर्यादी व त्यांच्या भावाला लोखंडी पाईपने मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या खिशातील 5 हजार 840 रुपये व त्यांच्या भावाच्या हातातील सोन्याची अंगठी गहाळ झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.