

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अभियान प्रारंभ असून, यासाठी आपणही काहीतरी करून सहभागी झाले पाहिजे, या संकल्पनेने नेवाशातील एक युवक सायकलवरून नेवासा फाटा ते अजमेरपर्यंत 'तिरंगा यात्रा'द्वारे नागरिकांमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे स्फुलिंग जागवणार आहे. अल्ताफ शेख, असे त्या युवकाचे नाव आहे. नेवासा फाटा ते अजमेर असा 936 किलोमीटरचा प्रवास सायकलवर करणार असून, तो बुधवारी (दि.10) पहाटे पाच वाजता रवाना झाला आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तिरंगा झेंडा फडकवत नेवासा फाटा येथील युवक अल्ताफ देशभक्तीची जाज्वल्य भावना मनी बाळगून 'हर घर तिरंगा' देशभर आयोजित केला जात असताना आपणही थेट नेवासा फाटा ते अजमेरपर्यंत तिरंगा फडकवण्यासाठी सायकल प्रवास करत असचे त्याने माध्यमांना सांगितले.
नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकातून तो बुधवारी पहाटे पाच वाजता अजमेरकडे तिरंगा झेंडा फडकवत सायकलवर स्वार होत रवाना झाला. यावेळी मित्र परिवारांकडून यासाठी त्याला शुभेच्छा देण्यात आल्या.
तो ओमसाई सायकलिंग ग्रूपचा सदस्य असून, त्याने यापूर्वी शिवनेरी, पंढरपूर, वणी, भद्रा मारुती, शेवगाव, गुजरात असा प्रवास केला आहे. बुधवारी अजमेरला रवाना झालेला युवक औरंगाबाद, कन्नड, चाळीसगावमार्गे अजमेरकडे आगेकूच करणार असून, पहिला मुक्काम दोनशे किलोमीटरवरील धुळे येथे करणार असल्याची माहितीही त्याने दिली.