नगर : मोहरम मिरवणुकीवर 64 इमारतींवरून वॉच!

नगर : मोहरम मिरवणुकीवर 64 इमारतींवरून वॉच!

नगर, पुढारी वृत्तसेवा : मोहरम मिरवणूकीच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त निवडणूक मार्गात तैनात केला आहे. पोलिस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली हा बंदोबस्त राहणार असून मिरवणूक मार्गातील 64 इमारतींवर पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 811 व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

देशातील प्रमुख मोहरम मिरवणूकीमध्ये नगरचा समावेश होतो. शहरातून सोमवारी रात्री 'कत्तल की रात' मिरवणूक काढण्यात आली त्या पार्श्वभूमिवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त शहरात होता. तसेच मंगळवार (दि.9) रोजी मोहरम मिरवणूक निघणार आहे. मोहरम मिरवणूकीत कोठला आणि मंगलगेट हवेली येथे मोठी गर्दी जमते. कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, 5 पोलिस उपअधीक्षक, 19 पोलिस निरीक्षक, 29 सहायक पोलिस निरीक्षक, 550 पोलिस कर्मचारी, 400 होमगार्ड असा पोलिसांचा मोठा बंदोबस्त मोहरम विसर्जन मिरवणूकीसाठी तैणात करण्यात आला आहे. यासोबतच राज्य राखीव पोलिस दलाच्या तीन तुकड्या, आर.सी.पी.ची तीन पथके तैणात करण्यात आली आहेत. मिरवणूक मार्गावर पोलिसांची करडी नजर राहणार असून 64 इमारतींवरून कॅमेर्‍यांनी चित्रीकरण होणार आहे. तसेच 3 ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शहरातून 176 जण हद्दपार

मोहरम विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलिसांनी 176 जणांना रविवारी (दि.7) सायंकाळी 6 ते मंगळवारी (दि. 7) रात्री 12 वाजेपर्यंत शहरातून हद्दपार केले आहे. त्यात कोतवाली हद्दीतून 51, तोफखाना हद्दीतील 45, तर कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 80 जणांचा समावेश आहे.

शहरातील 64 इमारतींवर पोलिस तैणात करण्यात आले आहेत. तसेच मिरवणूक मार्गांवर पोलिसांची नजर राहणार असून ड्रोन कॅमेर्‍यांनी चित्रीकरण करण्यात येणार आहे.

– अनिल कातकडे, पोलिस उपअधीक्षक

logo
Pudhari News
pudhari.news