नगर : मुळा पाणलोटात पाऊस ओसरला

नगर : मुळा पाणलोटात पाऊस ओसरला
Published on
Updated on

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या लाभक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाने उसंत घेतल्याने पाण्याची आवक घटली आहे. धरणसाठ्यात संथगतीने वाढ होत असून, 31 जुलैपर्यंत धरणसाठ्याने 20 हजाराची पातळी गाठली, तरच दरवाजे उघडले जाणार आहेत. धरणामध्ये सद्यस्थितीला 19 हजार 500 दलघफू (75 टक्के) पाणीसाठा जमा आहे.

मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले कोतूळ, पांजरे, हरिश्चंद्रगड हद्दीमध्ये दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे डोंगद दर्‍यातील झिरपणार्‍या पाण्यामुळे धरणाकडे केवळ 1 हजार 61 क्यूसेक इतकी पाण्याची आवक होत असल्याची नोंद गुरूवारी सायंकाळी 6 वाजता नोंदविण्यात आली. दरम्यान, मुळा धरणामध्ये सद्यस्थितीला 75 टक्के पाणी जमा झालेले आहे. 31 जुलैच्या आत धरणात 77 टक्के पाणी (20 हजार दलघफू) इतका पाणी जमा असल्यास धरणाचे दरवाजे उघडण्याचा शासकीय निर्देशांक आहे.

पाणलोट क्षेत्रावर दमदार पावसाची हजेरी झाल्यास धरणाचे दरवाजे उघडावे लागतील. अन्यथा, 15 ऑगस्टपर्यंत 22 हजार दलघफू इतका पाणी साठा होईपर्यंत धरणाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत, अशी माहिती शाखा अभियंता शरद कांबळे यांनी दिली आहे.
मुळा धरणाचे लाभक्षेत्र राहुरी परिसरात सायंकाळी धो धो पाऊस कोसळला. सुमारे दोन तास सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर नदीप्रमाणे पाणी वाहत होते. आषाढी सरींच्या रिमझिम वर्षावानंतर बुधवारी सायंकाळी मान्सून काळातील सर्वाधिक मोठा पाऊस राहुरी परिसरात झाला.

लाभक्षेत्राप्रमाणेच पाणलोट क्षेत्रावरही पावसाचा धो धो वर्षाव झाल्यास धरण भरण्यास अवधी लागणार नाही. 26 हजार दलघफू क्षमता असलेले मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अद्यापी 6 हजार 500 दलघफू पाण्याची गरज आहे. गुरूवारी लाभक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतलेली होती. पावसाने गारठलेले जनजीवन सुरळीत झाल्याचे दिसून आले. तर, पाणलोट क्षेत्रावरील पाऊस थांबल्याने धरण भरण्यासाठी श्रावण सरींची वाट पाहावी लागणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news