

जवळा, पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील जवळा गावातील आनंदनगर (मागासवर्गीय वस्ती) येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याचा वाल वस्तीजवळ रस्त्याच्या बाजूला आहे; परंतु त्या वालमधील पाणीपुरवठा चालू झाल्यावर मोठ्या प्रमाणात लिकेज होतो; त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतोच, शिवाय तिथे एक मोठा खड्डा तयार झाल्याने वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी त्या खड्ड्यात बसतात, लोळण घेतात; परिणामी पाणी दररोजच्या प्रक्रियेत दूषित होते.
यामुळे डास, पुरवठ्याचे पाणी बंद झाले की हे पाणी पुन्हा त्या पाईपमध्ये जाते, तेच पाणी पिल्याने लोकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाणात वाढते. काही रस्त्यावरून वहात जाते. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे, तसेच त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला असून, येथे घाणपाणी सतत साठते.
यापूर्वी अनेकदा ग्रामपंचायतमध्ये माहिती दिली होती; परंतु अद्यापही दुरुस्ती करणचात आलेली नाही. या घाण व दूषित पाणी साठल्यामुळे दुर्गंधी सुटते. यामुळे आजूबाजूच्या वस्तीत घाण व दूषित पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे रोगराई पसरली आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा करणार्या विहिरीतही ब्लिचिंग पावडर टाकण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायतीतील संबंधितांनी दखल घेण्याची मागणी भगवान खुपटे, विष्णू गाडे व अन्य नागरिकांनी केली आहे. अन्यथा, ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा इशारा खुपटे यांनी दिला.