संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक ते पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द या दोन गावांना जोडणार्या मुळा नदीवरील पुलाचे लोखंडी कठडे तुटले. त्यामुळे हा पूल वाहतुकीस धोकादायक बनला आहे. या पुलाच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य असे दुर्लक्ष होत आहे.
संगमनेर आणि पारनेर या दोन तालुक्यांना जोडणारा एकमेव मार्ग म्हणून साकूर ते टाकळी ढोकेश्वर हा मार्ग ओळखला जात आहे. या मार्गाने पारनेर, नगर व राळेगणसिद्धीला जाण्यासाठी, तसेच साकूर, आश्वी व संगमनेरला येण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यामुळे या रस्त्यावरती कायमच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. शाळकरी मुलांना शाळेत जाण्या-येण्यासाठी, शेतकर्यांचा शेतमाल संगमनेर व नगर येथे बाजारात नेण्यासाठीच हाच एकमेव मार्ग आहे.
मांडवे बुद्रूक आणि मांडवे खुर्द या दोन गावांना जोडणार्या मुळा नदीवरील पुलास लोखंडी पाईप व अँगलच्या सहाय्याने संरक्षण देण्यात आले होते. मात्र, एका बाजूने असणारे सुरक्षा गार्ड तुटलेली आहेत. काही ठिकाणी पाईप निघून गेले आहेत, तर काही ठिकाणी उभे अँगल वाकलेले आहेत. याकडे संगमनेर व पारनेर या दोन्ही तालुक्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती तत्काळ दुरुस्ती होणे गरजेचे आहे. हा पूल असाच नादुरुस्त राहिला, तर एखादी मोठी घटना घडण्याची दाट शक्यता आहे. अशी घटना घडण्याची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग पाहत आहे का? असा सवाल वाहन चालकांमधून केला जात आहे.