नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बाहेरील विद्यार्थ्यांना ‘चले जाव’चा इशारा

नगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठातील बाहेरील विद्यार्थ्यांना ‘चले जाव’चा इशारा
Published on
Updated on

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये झालेल्या वादंगात दगडफेक व हाणामारीच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. आमचा खून होण्यापासून वाचवा म्हणत कुलगुरू यांचे दालन गाठणार्‍या विद्यार्थ्यांचा व्हिडीओ सर्वत्र प्रसारित झाला. या प्रकरणानंतर विद्यापीठ प्रशासनाने अनाधिकृत विद्यार्थ्यांना विद्यापीठ हद्दीतून 'चले जाव' चा इशारा दिलेला आहे. विद्यापीठ सुरक्षारक्षकांसह पोलिसांसह विद्यापीठामध्ये तपासणी मोहिम हाती घेऊन कारवाई करणार असल्याचा इशारा विद्यापीठ कुलमंत्री महानंद यांनी दिला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये गेल्या काही दिवसांपासून पांढर्‍या हत्तीला काळे गडद रंग लावणार्‍या घटना घडल्या आहेत. परिणामी विद्यापीठ प्रशासन नेमक्या या घटनांकडे सहजतेने पाहिले जात असताना विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. रात्रीच्या वेळी अधिकृत प्रवेश असलेले व अनाधिकृ प्रवेश असलेले शेकडो विद्यार्थ्यांमध्ये टोळी युद्ध पेटले. एका गटाने थेट दगडफेक सुरू केल्यानंतर जीव वाचविण्यासाठी अधिकृत विद्यार्थ्यांनी कुलगुरू व सुरक्षारक्षक विभागाच्या कॅबिनचा आसरा घेतला. प्रकरण वाढत असताना कुलमंत्री माने व सुरक्षा अधिकारी गोरक्षनाथ शेटे यांनी सुरक्षारक्षकांच्या ताफ्यासह विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे दगडफेक करणार्‍या दुसर्‍या गटाने पोलिस आल्याची चाहूल लागताच पळ काढला.

विद्यार्थी व पालकांमध्ये खळबळ

या प्रकरणामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेऊन कृषी शिक्षणाचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पाहता शिस्त व कामकाजात सरळपणा बाळगणारे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील यांच्याकडून तातडीने कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. परंतु कारवाई पेक्षा चौकशी बरी अशी भूमिका घेत विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे.

दगडफेक झाली असल्यास पोलिस ठाण्यामध्ये अज्ञात विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल होणे गरजेचे होते. चुकीचे कृत्य करणार्‍यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी सर्वांची होती. परंतु तसा कोणताही प्रकार विद्यापीठ प्रशासनाकडून झालेला आहे. त्याउलट चुकीचे कृत्य करणारे व विद्यापीठ हद्दीमध्ये अनाधिकृतपणे वर्षानुवर्षे राहत मोफत जेवण व रहिवास करणार्‍यांना 'चले जाव' चा इशारा दिला. संबंधित चुकीचे कृत्य करणारे अनाधिकृत विद्यार्थी विद्यापीठातून निघून गेल्यानंतर कारवाई नेमकी काय करणार? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, विद्यापीठ कुलमंत्री माने यांनी माहिती देताना सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाने दगडफेक व अनाधिकृत विद्यार्थ्यांच्या चर्चेबाबत गंभीर दखल घेतली आहे. चुकीचे कृत्य झाले असल्यास त्याची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाकडून चौकशी समिती समिती स्थापन करण्यात आली आहे. विद्यापीठामध्ये गुरूवारी रोजी पोलिस व सुरक्षारक्षकांसह अनाधिकृत विद्यार्थ्यांची शोध मोहिम हाती घेतली जाणार आहे. त्यापूर्वी संबंधित अनाधिकृत विद्यार्थ्यांना 'चले जाव' ची नोटिस देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे प्रकरणही रफादफा करणार का?

कुलगुरू डॉ. पाटील यांच्या कार्यकाळामध्ये काही प्रकरणांची चांगलीच चर्चा घडली. यामध्ये एका अभियंत्याकडून ठेकेदाराकडे पैसे मागणीचे कॉल रेकॉर्डिंग असो की, एका अधिकार्‍याची रंगीत- संगीत लाखो रुपये उधळण केलेली पार्टीची चर्चा रंगली होती. या प्रकरणाबाबत कोणतीही कारवाई न करणारे विद्यापीठ प्रशासन दगडफेकबाबत कोणती कारवाई करणार? याबाबत चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news