नगर : भर पावसाळ्यातही राशीनमध्ये पाणीटंचाई

नगर : भर पावसाळ्यातही राशीनमध्ये पाणीटंचाई

राशीन, पुढारी वृत्तसेवा : पावसाळा असूनही राशिनकर पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. राशीनकरांना 15 ते 20 दिवसांनी पाणीपुरवठा होत असून, 25 हजार लोकसंख्या असणार्‍या गावास नळाला पाणी कधी सुटणार अशी म्हणण्याची वेळ आली आहे. जीव्हाळ्याचा हा प्रश्न कधी सुटणार अशी विचारणा होत आहे. पाणीटंचाईस महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण व तालुका प्रशासन अधिकारीच जबाबदार असल्याची माहिती राशीनच्या सरपंच नीलम साळवे व उपसरपंच शंकर देशमुख यांनी दिली.

सरपंच साळवे म्हटल्या, राशीनला पाणीपुरवठा करणारा थेरवडी तलाव कुकडीच्या आवर्तनातून भरून देण्यासाठी ग्रामपंचायतीने दोन्ही आवर्तनापूर्वी तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याकडे लेखी मागणी केली होती; परंतु पाणी न मिळाल्यामुळे थेरवडी तलावातून होणारा पाणीपुरवठा बंद झाला. खेड येथील भीमानदी पात्रातून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेवर वीजेचा प्रश्न निर्माण झाला.

यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महावितरण, तहसीलदार, गटविकास अधिकारी, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार रोहित पवार यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. आखेर अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. एक्सप्रेस फीडरवरून राशीन पाणी योजनेला वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडे एक लाख रुपये अनामत रक्कम भरण्यात आली. यानंतरही महावितरणचे कार्यकारी अभियंता जमदाडे यांना आमदार रोहित पवार यांनी सूचना करूनही त्याकडे अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तीन वर्षांमध्ये सहा वेळा ग्रामविकास अधिकारी अधिकारी बदलले. त्यामुळे कामकाज ठप्प होत आहे, तरी पूर्णवेळ ग्रामविकास अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news