नगर : भंडारदरा परिसरात भात रोपे बहरली

अकोले : मुळा प्रवरा पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे भात रोपे अवनीच्या प्रतीक्षेत दिसत आहे. (छाया : विलास तुपे)
अकोले : मुळा प्रवरा पाणलोट क्षेत्रात संततधार पावसामुळे भात रोपे अवनीच्या प्रतीक्षेत दिसत आहे. (छाया : विलास तुपे)

अकोले : पुढारी वृत्तसेवा : गेल्या दहा दिवसापासून हरिश्चंद्रगड व कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी असलेल्या भागात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे भातशेतीचे रोपे चांगले बहरायला सुरुवात झाली असल्याने शेतकरी राजादेखील सुखावला आहे. त्यामुळे लवकरच भात लावणीची ( आवणी) कामे देखील सुरू होतील, असा विश्वास आदिवासी भागातील शेतकर्‍यांनी व्यक्त केला आहे.

मुळा- प्रवरा पाणलोट क्षेत्रात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली, मात्र सामाधान कारक पाऊस पडत नव्हता. त्यामुळे अनेकांच्या पेरण्या बाकी होत्या. अखेर जूनच्या शेवट व जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचे आगमन होवून वातारणात गारवा निर्माण झाला आणि सगळीकडे हिरवळ पसरु लागली.तर सद्यस्थितीला भातरोपाची मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे.

पावसाची रिमझिम समाधानकारक असल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. आदिवासी भागातील भात शेती चांगलीच बहरण्यास सुरुवात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर सुरू असलेली पावसाची संततधार अशीच कायम सुरू राहिली तर भात लावणीच्या कामाला देखील सुरुवात होईल आणि लावणी देखील वेळेत संपेल, अशी आशा शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

आदिवासी भागातील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात भात शेतीचे पीक घेतले जाते. यामध्ये कोलम, इंद्रायणी, 1008, काळभात, आंबीमोहर, बासमती, निळं भात आदी पिकाची पेरणी केली जाते. दरवर्षी पेरणीच्या वेळेस पावसाचे आगमन होऊन पुन्हा सात, आठ दिवस पाऊस गायब होत असतो. मात्र यावर्षी उशीरा आलेला मान्सुन सद्यस्थितीला समाधानकारक असून संततधार पडत असल्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे. सद्यस्थितीला पेरणी केलेले पिक चांगले उगवली असून बहरलेले भात रोपे आठ, दहा दिवसात लावणी योग्य तयार होऊन लावणीच्या कामाला सुरुवात देखील होईल, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

तसेच दोन- तीन वर्षापूर्वी नेहमीच येणार्‍या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान यावर्षी होऊ नये, अशी आशा शेतकरी राजाने व्यक्त केली आहे. अधून-मधून संततधार पडणार्‍या पावसामुळे पाचनई, कुमशेत, आंबित, शिरपुंजे, रतनवाडी, भंडारदरा, घाटघर हा सगळा परिसर हिरवागार झाला आहे.

भंडारदरा धरण 26 टक्के भरले

भंडारदरा धरणाचा आजचा पाणी साठा 2870(26 टक्के) दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे. आत्तापर्यंत रतनवाडी 57 मि.मी (एकूण 720 मि.मीटर) , पांजरे 52 मि.मी (एकूण 414), भंडारदरा 50 मि.मी(326 मि.मीटर), घाटघर 60 मि.मीटर (एकूण 680 मि.मीटर), वाकी 40 मि.मी (220 मि.मीटर) एकूण मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची नोंद पाटबंधारे विभागात झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news