

नगर, पुढारी वृत्तसेवा : नवरात्र उत्सव दि.26 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार आहे. या उत्सवाची जय्यत तयारी नगरची कुलस्वामिनी असलेल्या बुर्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिरात सुरू झाली आहे. भाद्रपद शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर रविवारी तुळजाभवानी देवीच्या पालखीचा दांडा राहुरी येथे नवा पाळणा बनविण्यासाठी विधिवत पूजा करून रवाना करण्यात आला.
राहुरी येथे दरवर्षी नव्याने पालखी तयार केली जाते. बुर्हाणनगरच्या तुळजाभवानी देवी मंदिराचे मुख्य पुजारी अॅड.विजय भगत व दुर्गा भगत यांनी पालखीच्या पौराणिक दांड्याची विधिवत पूजा व आरती केली. यावेळी पुजारी अॅड.अभिषेक भगत, कुणाल भगत आदींसह भाविक उपस्थित होते. संबळ व वाजंत्री वाजवून जल्लोषात ही पालखी राहुरीकडे रवाना करण्यात आली.
अॅड.भगत म्हणाले, महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरच्या भवानीदेवीच्या पालखीचा मान गेल्या एक हजारांहून अधिक वर्षांपासून बुर्हाणनगरच्या भगत कुटुंबाकडे आहे. तुळजाभवानीच्या सीमोल्लंघनासाठी नगरमधून दरवर्षी पालखी जाते. या पालखीला लागणार्या सर्व साहित्यासह सुमारे 200 वर्षे जुना असलेला पालखीचा ऐतिहासिक दांडा राहुरीच्या सुताराकडे पालखीचा पाळणा बनविण्यासाठी रवाना करण्यात आला.
अॅड.अभिषेक भगत म्हणाले, नवरात्र उत्सवानिमित्त तुळजाभवानी देवीच्या पालखी सोहळ्यास सुरुवात झाली आहे. राहुरीमधील सुतार पालखीचा नवा पाळणा बनवून दि.10 सप्टेंबरपासून ही पालखी राहुरी, पारनेर व नगर तालुक्यात 40 गावांना सालाबादप्रमाणे जाऊन बुर्हाणनगर येथील तुळजाभवानी देवीच्या या मंदिरात येते. येथून ही पालखी श्रीक्षेत्र तुळजापूरकडे रवाना केली जाते. साक्षात तुळजाभवानी देवीच या पालखीत असल्याने, या पालखीत देवीची कोणतीही मूर्ती किंवा फोटो ठेवला जात नाही. बुर्हाणनगर येथील भगत परिवार एक हजारहून अधिक वर्षांपासून ही परंपरा जपत आहे.