

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : बुर्हाणनगर पाणी योजनेची पाईपलाईन शिंगवे येथे शनिवारी (दि.25) पुन्हा फुटली. या योजनेवर अवलंबून असलेल्या नगर तालुक्यातील 42 गावांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. पाईपलाईन दुरुस्तीचे काम सुरू असून, या कामाला वेळ लागत असल्याने एक दोन दिवसात ते पूर्ण करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी दिली.
तालुक्यातील बर्याच गावामध्ये क्षारयुक्त पाणी असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी 42 गावे या योजनेवरच अवलंबून आहेत. या योजनेला बर्याच ठिकाणी मुख्य पाईपलाईनला जोड देण्यात आाला आहे. त्यामुळेही पाणी शेवटच्या गावांना पोहचण्यास खूप उशीर होतो. सुमारे पाच तासात भरणारी वारूळवाडीची मुख्य टाकी भरायला 12 ते 15 तास लागतात त्यामुळे मुख्य पाईपलाईनला असलेले अनधिकृत जोड बंद करावे लागणार आहे.
पाईपलाईन नेमकी एका किराणा दुकानाच्या खाली फुटली असून, ती त्या ठिकाणी 10 ते 12 फुट खोलीवर आहे. दुकानाचे शटर, शेडचे आधार काढावे लागले. ते कोसळण्याचा धोका असल्याने रात्री काम बंद करण्यात आले. यानंतर रविवारी (दि.26) सकाळी लवकर सुरू करण्यात आले. सायंकाळपर्यंत किंवा सोमवारी सकाळपर्यंत हे काम पूर्ण होईल, असे कार्ले यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेंद्र भगत, व्ही.डी. काळे, विश्वास जाधव, जावेद सय्यद, राहुल धामणे, ज्ञानेश्वर जाधव, लखन जाधव, किरण शेळके, शैलेश काळे, प्रमोद साळवे आदी उपस्थित होते.