

संगमनेर, पुढारीवृत्तसेवा : संगमनेर शहरातील नेहरू चौकातील सुरभी बियर बारमध्ये बनावट दारुविक्री करणार्यांविरोधात तत्काळ कारवाई करून, बनावट दारुविक्री करून मानवी जी विताशी खेळ करणार्या सुरभी बियर बारचा लवकरच बंदोबस्त केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकार्यांसह जिल्हा पोलिस प्रमुख व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांनी संगमनेर येथील दारूबंदी कृती समितीच्या पदाधिकार्यांना दिल्यानंतर अखेर आज सुरभी बियर बार सील करण्यात आला आहे.
संगमनेर तालुक्यातील रायतेवाडी शिवारात चैतन्य मंडलिक याच्या घरामध्ये गोवा, दिव-दमण येथून बनावट दारू आणून ती मिक्स करण्याचा कारखाना अनेक दिवसांपासून राज्य उत्पादन शुल्क व संगमनेर पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू होता. याबाबतची खात्रीशीर माहिती राज्य उत्पादन शुल्कच्या अ. नगर येथील पथकास समजली. या पथकाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी छापा टाकत बनावट दारू तयार करण्याचा कारखानाच उद्ध्वस्त केला.
या प्रकरणी बनावट दारू तयार करणार्या कारखान्याचा मालक चैतन्य मंडलिकसह बनावट दारू विक्री करणार्या सुरभी हॉटेल मालक सुरेश कालडा या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडूनच गोवा राज्य निर्मित व महाराष्ट्रात बंदी असलेल्या 687 सील बंद बाटल्या 7500 बनावट बाटल्यांचे बूच व हुंदाई कार असा एकूण 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. अकोले येथे दुकान चालविणारा शिवा मनोज कुमार काला यालाही राज्य उत्पादन शुल्कच्या पोलिसांनी ताब्यात घेत त्याचेही दुकान बंद केले आहे.
बनावट दारू पकडण्याची एवढी मोठी कारवाई होऊनसुद्धा नेहरू चौकात सुरभी बियर बार चालूच आहे. तो लवकर बंद करून, बंदोबस्त करून तोही सील करावा, अशा मागणीचे निवेदन दारू बंदी समितीचे जिल्हाध्यक्ष, शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, शिवसेना महिला आघाडीच्या संगीताताई गायकवाड, आशाताई केदारी, व्यापारी आघाडीचे संभव लोढा, प्रशांत खजुरे, रंगनाथ फटांगरेंसह कृती समितीने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलिसप्रमुख मनोज पाटील व राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक गणेश पाटील यांना अ. नगर येथे दिले होते.