नगर : बँकेसाठी गुरुजींची ‘चिखलफेक’!

नगर : बँकेसाठी गुरुजींची ‘चिखलफेक’!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक बँकेच्या 21 जागांसाठी होणार्‍या चौरंगी लढतीत 9 बंडखोरांसह 93 उमेदवार रिंगणात उतरले आहे. काल अधिकृत चिन्हे मिळाल्यानंतर सर्वच संघटनांनी प्रचाराला वेग दिला आहे. दरम्यान, भरपावसाळ्यात सुरू झालेल्या निवडणूक प्रचारात काल मंगळवारी पहिल्याच दिवशी गुरुजींमध्ये आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झाल्याची चर्चा आहे. याशिवाय, कालपासूनच हॉटेल, ढाबेही बहरताना दिसत असल्याने ही निवडणूक चांगलीच गाजण्याची चिन्हे आहेत.

जिल्ह्यातील 10464 शिक्षक सभासदांची जिव्हाळ्याचा विषय असलेल्या शिक्षक बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. सत्ताधारी गटाचे नेते बापूसाहेब तांबे, रावसाहेब रोहोकले, डॉ. संजय कळमकर, राजेंद्र शिंदे यांच्या राजकीय अस्तित्वाची ही निवडणूक असणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत 'साम दाम दंड भेद' वापरून ही निवडणूक जिंकायचीचं, असा चंग सर्व शिक्षक नेत्यांनी बांधला आहे. या लढ्यात उमेदवारांनाही आपले बहुमोल योग'दान' दिल्याने या निवडणुकीकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

काल मंगळवारपासून प्रवेश सोहळे, तालुकानिहाय प्रचार सभा, जेवनावळींना वेग आला आहे. प्रचारांत आरोपांच्या फैर्‍याही सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी गटातील बापूसाहेब तांबेंना लक्ष्य करण्यासाठी घड्याळ घोटाळ्यासह 18 आरोपांना 'शस्त्र' म्हणून विरोधक चालविणार आहेत. तर रोहोकले गुरुजींना विकास मंडळाच्या इमारत कामाचे टेंडरसह अन्य आरोपांतून घेरण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असतील. तर, डॉ. संजय कळमकर यांच्या सत्तेच्या कालावधीत झालेल्या काही निर्णयांचे राजकीय भांडवल विरोधक करणार आहेत. तर, चौथ्या आघाडीला मिळणारी मते रोखण्यासाठी 'मते वायला घालू नका' असा प्रचार कालपासूनच काही प्रमुख मंडळांनी सुरू केला आहे. त्यामुळे काल पहिल्या दिवशी काही कार्यकर्त्यांच्या मनोगतातून 'ट्रेलर' दिसलेल्या या निवडणुकीचा संपूर्ण 'पिक्चर' पुढे जिल्ह्याला पहायला मिळणार आहे. यात, भावा-भावातील 'महाभारत'हा देखील चर्चेचा विषय ठरणार आहे.

दरम्यान, शिक्षक बँकेच्या निवडणुकीत अनेक मुद्दे गाजणार आहेत. आपल्या जाहीरनाम्याबरोबरच विरोधकांचा चुकीचा कारभार, त्यांच्यावरील गंभीर आरोप सभासदांच्या मनावर बिंबवण्यात कोण यशस्वी होतो, त्यावरच विजयाचे गणित ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीतील धारदार प्रचाराकडे सभासदांचे लक्ष असणार आहे.

'त्या' संघटना हवेतच; नाराज 'काम' दाखविणार

बँकेसाठी चौरंगी लढत होत आहे. त्यात, मतविभाजनाचा फायदा आपल्यालाच होणार, तीन हजार मतांचा जादूई आकडा आपल्याकडे आहे, अशा भ्रमात काही शिक्षक नेते आहेत. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. अंतर्गत गटबाजी आणि नाराजांच्या फौजेने 'काम' सुरू केले आहे. एका दावेदार मंडळाच्या पदाधिकार्‍याने मला आणि पत्नीलाही डावलले, आपण दाखवून देऊ, असा इशारा देताना आपल्या भावनांना आवर घातली. एका मंडळाच्या इच्छुकाला डावलल्याने 'तो' ढसाढसा रडला. तर एका महिला भगिनीने 'त्या' नेत्याला शिव्याशाप दिल्याची चर्चा आहे.

चर्चेतील उमेदवार

डॉ. संजय कळमकर : गुरुकुल, संजय धामणे : गुरुकुल, प्रवीण ठुबे : रोहोकले गुरुजी, विकास डावखरे : रोहोकले गुरुजी, संजय शिंदे : रोहोकले (नॉन टिचींग), कल्याण लवांडे ( गुरुमाऊली), राजकुमार इथापे ( रोहोकले), रमजान पठाण ( गुरुकुल)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news