नगर : प्रवरेमध्ये गणेश विसर्जनास परवानगी नाही

संगमनेर : पालिका सभागृहात गणेशोत्सवानिमित्त बैठकीत बोलताना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे. समवेत अधिकारी.
संगमनेर : पालिका सभागृहात गणेशोत्सवानिमित्त बैठकीत बोलताना प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे. समवेत अधिकारी.

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : सध्या भंडारदरा व निळवंडे या दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणात प्रवरा नदीला पाणी सोडले आहे. त्यामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. गणेश विसर्जनाच्या वेळी कुठलीही जीवित हानी होऊ नये, यासाठी गणेश विसर्जन करण्यासाठी थेट प्रवरा नदीपात्रात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती संगमनेर उपविभागाचे प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी गणेश मंडळांना दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर नगरपालिकेच्या रामकृष्णदास सभागृहामध्ये समन्वय समितीची बैठक पार पडली. यावेळी प्रांताधिकारी तथा पालिकेचे प्रशासक डॉ. शशिकांत मंगरुळे, पोलिस उपाधीक्षक राहुल मदने, मुख्याधिकारी राहुल वाघ, शहर प्रभारी स. पो. नि. सुजित ठाकरे, पालिका कार्यालयीन अधीक्षक राजेश गुंजाळ, सर्व अधिकारी व गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. मंगरुळे म्हणाले, यंदा नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी थेट प्रवेश दिला जाणार नाही. पालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहे. त्या तलावामध्येच गणेश भक्तांनी गणेशाचे विसर्जन करावे. त्यादृष्टीने पालिकेच्या वतीने नियोजन केले जाणार आहे. मिरवणूक मार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे, असे सांगत ते म्हणाले, यावेळी गणेशभक्तांनी शाडू मातीच्या गणेश मूर्ती बसवाव्या. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळे कामाला लागले आहेत. त्यांच्या आनंदावर कुठल्याही प्रकारचे विरजण पडणार नाही. गणेशोत्सव काळामध्ये महावितरण कडून वीज पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता प्रशासनाच्या वतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी काळजी करू नये, असे आवाहन डॉ. मंगरुळे यांनी केले.

गणेशोत्सवाच्या काळात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलिस बंदोबस्त दिला जाईल, असे आश्वासन पोलिस उपाधीक्षक राहुल मदने यांनी दिले. गणेशोत्सवादरम्यान पालिकेच्या उपाययोजनांची माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी प्रास्ताविकात दिली. आभार राजेश गुंजाळ यांनी मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news