नगर : पिंपळगाव उज्जैनी मंदिरात चोरी

नगर : पिंपळगाव उज्जैनी मंदिरात चोरी

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी येथील उज्जैनीमाता मंदिरात चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील सोन्याचे दागिने, चांदीचा मुकुट, चांदीचे शिवलिंग, दानपेटीतील रक्कम असा 1 लाखापेक्षा जास्त ऐवज चोरून नेला आहे. मंगळवारी रात्री ही चोरी झाली.

याबाबत जगन्नाथ विश्वनाथ मगर (रा.पिंपळगाव उज्जैनी, ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपळगाव उज्जैनी गावच्या शिवारात डोंगरावर उज्जैनीमाता मंदिर आहे. पुजारी मंगळवारी (दि.9) सायंकाळी मंदिराचा दरवाजा बंद करून घरी गेले. त्यानंतर बुधवारी (दि.10) सकाळी 6.30 च्या सुमारास पुन्हा मंदिर उघडून पूजेसाठी आले असता, त्यांना मंदिरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

चोरट्यांनी उज्जैनी मातेच्या मूर्तीवरील 4 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, दीड किलो वजनाचा चांदीचा मुकुट, चांदीचे शिवलिंग असा ऐवज चोरून नेला. त्याचबरोबर मंदिरात असलेली दानपेटी फोडून त्यातील अंदाजे 10 ते 12 हजार रुपयांची रोकडही लांबविली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंदिरात चोरी झाल्याची माहिती मिळताच नगर शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे, एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे, पोलिस उपनिरीक्षक हंडाळ यांनी मंदिर परिसरात भेट देऊन पाहणी केली. चोरीची माहिती पसरल्यानंतर अनेक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली होती. या चोरीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news