नगर : पाच दिवसांत 24 हजार जणांनी घेतला बुस्टर

नगर : पाच दिवसांत 24 हजार जणांनी घेतला बुस्टर
Published on
Updated on

नगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना देखील बुस्टरचा डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर आता गर्दी वाढू लागली आहे. गेल्या पाच दिवसांत 24 हजार 96 नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे.

कोरोना संसर्गाने दोन वर्षात सर्वच जनजीवन विस्कळीत केले. पहिली आणि दुसरी लाट जीवघेणी ठरली. या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम हाती घेतली. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यातील 18 वर्षापेक्षा अधिक वयोगटातील 30 लाख 82 हजार 823 नागरिकांनी पहिला तर 24 लाख 46 हजार 476 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. आतापर्यंत 68 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.

दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिन्यांनी बुस्टर डोस घेणे अनिवार्य आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वयोमान असणार्‍या तसेच फ्रंटलाईनवर्कर, आरोग्य कर्मचारी यांना मोफत बुस्टर देण्याचा निर्णय सरकारने घेतला. उर्वरित 18 ते 59 वयोगटातील नागरिकांसाठी खासगी रुग्णालयांत बुस्टर डोस उपलब्ध केला. मात्र, यासाठी या नागरिकांना पावणेचारशे ते चारशे रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे विकतचा बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळू लागला. 14 जुलैपर्यंत 18 ते 59 वयोगटातील फक्त 983 नागरिकांनी पैसे मोजून बुस्टर डोस घेतला.

केंद्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर 75 दिवस बुस्टर डोस मोफत देण्याचा निर्णय घेतला. 15 जुलैपासून ही मोहीम सुरु झाली. त्यामुळे आता जिल्ह्यामधील 435 लसीकरण केंद्रांवर मोफतचा बुस्टर डोस घेण्यासाठी लाभार्थी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. दि. 14 जुलैपर्यंत 18 ते 45 वयोगटातील 805 तर 45 ते 59 वयोगटातील 178 नागरिकांनी पैसे अदा करुन बुस्टर डोस घेतला होता. आतापर्यंत एकूण 89 हजार 515 नागरिकांनी बुस्टर डोसचा लाभ घेतला होता.

1 लाख 22 हजार बुस्टरधारक

मोफतचा निर्णय होताच शुक्रवारपर्यंत (दि.21) तब्बल 24 हजार 96 नागरिकांनी मोफत बुस्टर डोस घेतला आहे. आतापर्यंत एकूण 1 लाख 22 हजार 679 नागरिकांनी बुस्टर घेतला. आतापर्यंत फक्त 3.4 टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे. बुस्टर डोस मोफत उपलब्ध झाल्यामुळे लसीकरणाचा वेग वाढणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news