नगर : पहिल्याच पावसात बंधारे गेले वाहून

शिराळ (ता. पाथर्डी) येथे पावसाच्या पाण्याने वाहून गेलेला बंधारा. (छाया : मयूर मुखेकर)
शिराळ (ता. पाथर्डी) येथे पावसाच्या पाण्याने वाहून गेलेला बंधारा. (छाया : मयूर मुखेकर)

करंजी : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील कोल्हार, शिराळ चिचोंडी परिसरात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाले ओसंडून वाहिले. अनेक बंधारे यावर्षी पुन्हा एकदा फुटल्याने शेत जमिनीही वाहून गेल्या. त्यामुळे बंधार्‍यांची कामे निकृष्ट झाल्याच्या शेतकर्‍यांच्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे.

कोल्हार, शिराळ चिचोंडी परिसरात पहिल्याच पावसात अनेक बंधार्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील वर्षी फुटलेले बंधारे यावर्षी दुरुस्त करूनही पुन्हा एकदा फुटल्याने या कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिराळ येथील गोरेवस्तीजवळ बंधारा बांधण्यासाठी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. बंधारा झाल्यानंतर तो गेल्या वर्षी 30 ऑगस्टला झालेल्या पावसात फुटून गेला. यावर्षी याच बंधार्‍यासाठी राज्य शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत दुरुस्तीसाठी 13 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या बंधार्‍याची दुरुस्ती पूर्ण होते न होते तोच रविवारच्या पावसाने हा बंधारा पुन्हा एकदा वाहून गेला आहे.

या घटनेमुळे ठेकेदार व प्रशासकीय अधिकार्‍यांचा पारदर्शकपणा पुन्हा एकदा उघडकीस आला असल्याचा आरोप शेतकरी उद्धव गोरे, रमेश पाथरकर, शरद मुळे यांनी केला आहे. बंधारे बांधणे आणि पुन्हा त्याची दुरुस्ती करणे, यातून ठेकेदार व अधिकार्‍यांना मोठा पैसा मिळतो. त्यामुळे बंधार्‍यांची कामे निकृष्ट दर्जाची होतात, असा शेतकर्‍यांचा आरोप आहे. बंधारे फुटून शासनाचाही पैसा पाण्यात गेला असून शेतकर्‍यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिराळचे शेतकरी विष्णू गव्हाणे, उद्धव गोरे, संजय महाराज मुळे यांनी केली आहे. प्रशासन यावर काय भूमिका घेते, ठेकदारावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शासनाच्या मृद व जलसंधारण विभागामार्फत बारा बंधार्‍याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आलेला असून दुरुस्ती सुरू असतानाच पाऊस आल्याने बंधार्‍याचे नुकसान झाले आहे.

                                                – आर. एल. भोसले, उपअभियंता, मृद व जलसंधारण.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news