

नगर, पुढारी वृत्तसेवा : राज्य तंत्रशिक्षण विभागातर्फे शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता होणार्या पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रीयेसाठी मुदतवाढ दिली आहे. त्याबाबतची अधिसूचना वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रथम वर्ष पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जुलै असून थेट द्वितीय वर्षासाठी 29 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. सदर मुदत वाढीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक डॉ. अभय वाघ यांनी केले आहे.
नगर जिल्ह्यासाठी यंदा पदविका प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रथम वर्ष प्रवेशासाठी आजपर्यंत जवळपास 8000 पेक्षा जास्त विध्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केला असून सुमारे 7300 विध्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क भरून प्रवेश अर्ज निश्चित केला आहे. तसेच थेट द्वितीय वर्षाकरिता आजपर्यंत जवळपास 3800 पेक्षा जास्त विध्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केला असून सुमारे 3200 विध्यार्थ्यांनी नोंदणी शुल्क भरून प्रवेश अर्ज निश्चित केला आहे, अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य तथा जिल्हा नोडल अधिकारी श्री. बाळासाहेब कर्डिले यांनी दिली आहे.
प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यात 7 हजाराहून अधिक जागा आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दहावी आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षणाच्या पदविका अभ्यासक्रमांचा ही पर्याय उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज ऑनलाईन भरायचे आहेत.
ऑनलाईन अर्ज करताना प्रथम तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑनलाईन अर्ज करीत आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड कराव्यात. ऑनलाईन पद्धतीमध्ये दोन पर्याय आहेत. कोविड-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे, तसेच विद्यार्थी व पालकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी पर्याय निवडावा, अशी विनंती विद्यार्थी व पालकांना करण्यात आली आहे. या पर्यायामध्ये विद्यार्थ्याला ऑनलाईन फॉर्म भरून, प्रिंट घेऊन सर्व मूळकागदपत्रांसह सुविधा केंद्रावर उपस्थित राहून निश्चित करणे आवश्यक आहे.
शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर संस्थेत एकूण 520 विध्यार्थ्यांच्या प्रवेश क्षमतेसह 08 पदविका अभ्यासक्रमांच्या शाखा कार्यान्वित आहेत. तसेच चालू शैक्षणिक वर्षात कॅम्पस मुलाखती मध्ये 275 विद्यार्थ्यांची निवड विविध नामांकित कंपनी मध्ये झाली असून त्यांना जास्तीत जास्त 3.75 लाखांचे वार्षिक वेतन मिळाले आहेत. तसेच कॅम्पस मुलाखतीची प्रक्रिया अजूनही सुरु असून प्रत्येक विद्यार्थ्याला नौकरीच्या विविध संधी शासकीय तंत्रनिकेतन अहमदनगर उपलब्ध करून देते आहेत.