नगर : पंपावरील रोकड चोरणारा गजाआड
नगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नगर – मनमाड रोडवरिल दीपक पेट्रोल पंपावरील दहा लाख रुपये घेऊन पसार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपीला 2 लाख रूपये रोख रकमेसह पकडण्यात आले आहे.
ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस (वय 38, रा. ख्रिश्चन कॉलनी, तारकपूर, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
शहरातील दीपक पेट्रोलपंपावर आरोपी हा मॅनेजरच्या हुद्यावर काम करत होता. दि.19 एप्रिल 2022 रोजी दीपक पेट्रोल पंपावरील जमा झालेली रोख रक्कम 9 लाख 97 हजार 384 व कामगारांचे पगाराची रोख रक्कम 40 हजार असे एकूण 10 लाख 37 हजार 384 रूपये बँकेत भरणा करण्यासाठी ऑगस्टीन जॉर्ज गोन्सालविस याला दिली होती. परंतु, रक्कम बँकेत भरणा न करता आरोपी परस्पर रोख घेऊन पसार झाला होता.
या घटनेबाबत अनिल भोलानाथ जोशी (रा.मेघराज कॉलनी, सहकार नगर, सावेडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी ऑगस्टीन गोन्सालविस हा कल्याण तालुक्यातील अंबरनाथ येथे त्याच्या नातेवाईकांकडे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, संजय खंडागळे, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, सखाराम मोटे, भीमराज खर्से, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दीपक शिंदे, उमाकांत गावडे आदींच्या पथकाने केली.