नगर : नेवासा तालुक्यातील सोसायट्यांची सत्ता तरुणांच्या हाती

नगर : नेवासा तालुक्यातील सोसायट्यांची सत्ता तरुणांच्या हाती

Published on

नेवासा : पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील 125 सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकांचा धुराळा विरला. परंतु या निवडणुकांच्या माध्यमातून आलेल्या जबरदस्त परिवर्तनाच्या लाटेत वर्षानुवर्षांची सत्ता असलेल्यांच्या सोसायट्यांचे गड, किल्ले नव्या पिढीने भुईसपाट केले. अनेकांना चपराक दिली. नेवासा तालुक्यात बर्‍याच सेवा सोसायट्यांच्या संचालकांत तरुण वर्गांचा समावेश झाल्याने मतदारांनी तरुणांच्या हातात सोसायट्यांची सत्ता दिल्याचे दिसत आहे.

तालुक्यातील महत्त्वाच्या सोसायट्यांत परिवर्तन घडून नवे नेतृत्व गावोगावी सहकारात पुढे आले आहे. प्रस्थापित बनलेल्या जुन्या संचालकांना मतदारांनी या निवडणुकीत अडगळीत फेकले आहे. सहकारातील सत्तेचा महामार्ग उच्चशिक्षित नवतरुण, नवख्यांच्या हाती सोसायट्यांच्या मतदारांनी सोपवला आहे.

तालुक्यातील तेलकुडगाव, भानस हिवरे, माका, चिलेखनवाडी, अंतरवाली, देडगाव, देवसडे, वाकडी, दिघी, पाथरवाले, चांदा, देवगाव, शहापूर, नागापूर, गेवराई, देडगाव, पिंप्री शहाली, सुलतानपूर या लहान-मोठ्या गावांसह तालुक्यातील 60 टक्क्यांहून अधिक सोसायट्यांत नवख्या मंडळींना सहकारी सोसायटीत यावेळी संधी मिळाली आहे. ज्या सोसायट्या परिवर्तनापासून दूर राहिल्या तेथे प्रबळ विरोधक म्हणून विरोधी सदस्यही निवडून आले आहेत.

सोसायटी निवडणुका, ग्रामपंचायत निवडणुकांपेक्षाही चुरशीने झाल्या. पूर्वी सोसायटीची निवडणूक म्हटले की, सत्ताधार्‍यांशिवाय कोणाचीच डाळ शिजत नसे. त्यामुळे वर्षांनुवर्षे तेच ते लोक सदस्य रहात. पुढे बहुतेक सोसायट्यांच्या पदाधिकारी व सचिवांना भ्रष्टाचाराचे कुरण दिसू लागले. अशा सोसायट्यांची आर्थिक स्थिती ढासळत गेली. अशाच सोसायट्या परिवर्तनाच्या लाटेत सापडल्या. गेल्या अनेक वर्षांत सोसायट्यांच्या निवडणुकांत घडले नाहीत, असे बदल यावेळी घडले.

सहकारात ज्यांच्या हातून काही चांगले घडेल, अशी अपेक्षा असलेल्यांनाच मतदारांनी पसंती दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. काही सोसायट्या बिनविरोध करून मतदारांनी पाठबळ दिल्याचा अनुभवही आला आहे. या निवडणुकीत परंपरेने आपल्याच हाती सत्ता राहील, हे प्रस्थापितांचे मनसुबे मतदारांनी उधळून लावले. ज्यांनी सोसायटीचा कारभार चोखपणे सांभाळला नाही किंवा सांभाळणेही जमणार नाही, अशांना मतदारांनी खड्यासारखे दूर फेकले आहे.

असे आहे तालुक्याचे चित्र

तेलकुडगावात त्रिमूर्तीचे साहेबराव घाडगे पाटील, भानस हिवरेत किशोर जोजार,माका येथे सरपंच नाथा घुले व अनिल घुले, अंतरवालीत सरपंच संदीप देशमुख, जेऊर हैबतीत अजय रिंधे व सरपंच महेश म्हस्के, चिलेखनवाडीत संजय सावंत व तुकाराम गुंजाळ, देवगावात माजी सरपंच गोरक्षनाथ निकम यांच्या मंडळांनी परिवर्तन घडवले. वडुले येथे दिनकर गर्जे व तरवडीत अमोल अभंग यांना निवडणूक बिनविरोध करण्यात यश आले. पाचुंदे, वाकडी, गेवराई, दिघी, नजीक चिंचोली येथे परिवर्तन घडले.

सोसायट्या ग्रामीणचा अर्थकारणाचा कणा

सहकारी सोसायट्या ग्रामीण परिसराच्या अर्थकारणाचा कणा आहेत. या निवडणुकांत नव्या दमाच्या तरुणांनी प्रस्थापितांना धूळ चारल्याचे आशादायी चित्र या निमित्ताने पाहण्यास मिळाले आहे. काही सोसायट्यांत सत्तांतर, काहींत प्रबळ विरोधक, तर काहींत काठांवर बहुमत देत सोसायट्यांवरही अंकुश ठेवण्यात मतदार यशस्वी झाले आहेत. स्थानिक पातळीवर अटी-तटीच्या लढती होऊन अनेकांना धक्के बसले आहेत. नेवासा तालुक्यातील बर्‍याच सोसायट्यांवर मतदारांनी तरुणांना संधी दिल्याचे दिसत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news