

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : नेवासा तहसील कार्यालयासमोर गटाराच्या पाण्याचे डबके झाल्याने नागरिकांना चालताना कसरत करावी लागत आहे. अधिकार्यांचा या रस्त्यावर दररोज राबता असतानाही याकडे दुर्लक्ष कसे? हा प्रश्न नागरिकांत निर्माण झाला आहे.
तालुक्यातील विविध गावांतील नागरिक आपापल्या कामांसाठी दररोज तहसील कार्यालयात व पोलिस ठाण्यात येत असतात. सध्या पावसाचे दिवस असल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य होते. तहसीलच्या आत जात जातानाच गेटसमोरच परिसरातील गटाराचे पाणी रस्त्यावर येत असल्याने या ठिकाणी मोठे डबके निर्माण झाले आहे. थोडा जरा पाऊस झाला की, या गेटसमोर पाण्याचे रस्त्यावरच तलाव सारखी परिस्थिती निर्माण होते. त्यात गटाराचे पाणी असल्याने परिसरात दुर्गंधी येते.
नागरिकांना तहसील व पोलिस ठाण्यात जाताना कसरत करावी लागते. दररोजच्या कामांसाठी अधिकारी, कर्मचारी, नागरिकांचा राबता सतत चालू असला, तरी अनेक जण गप्प आहेत. याबाबत हा हालचाली करतील किंवा तो काही तरी करीन या अविर्भावात वागताना दिसत आहेत. नगरपंचायतीला काहींनी तोंडी तक्रार केल्याचे सांगितले जाते. परंतु उपयोग झाला नाही. याप्रकरणी नगरपंचायतीचे अधिकारी, कर्मचारी मूग गिळून असल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या रस्त्यावर गटाराकरिता पाईप गाडला गेला, तर हा प्रश्न मार्गी लागेल या करिता कोणीही पाठपुरावा करताना दिसत नाही.
कामांकरिता बाहेरगावाहून आलेल्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा वाहन चालताना गेटसमोरील डबक्यातील पाणी इतरांच्या अंगावर उडाल्याने शाब्दिक चकमकी झाल्या आहेत. नगरपंचायतीच्या अधिकार्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. तहसीलमधील अधिकार्यांना काहीही घेणे देणे नाही, अशी भूमिका घेतल्याने हा प्रश्न कधी सुटणार? हाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.