नगर : निंबळकच्या पाण्याचा प्रश्न मिटला

नगर तालुका : एमआयडीसी अधिकार्‍यांना धनादेश देताना सरपंच प्रियंका लामखडे व ग्रामविकास अधिकारी सविता लांडे.
नगर तालुका : एमआयडीसी अधिकार्‍यांना धनादेश देताना सरपंच प्रियंका लामखडे व ग्रामविकास अधिकारी सविता लांडे.
Published on
Updated on

नगर तालुका, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील निंबळकला भेडसावणारा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात ग्रामपंचायतला यश आले. ग्रामपंचायततर्फे पाण्याच्या वाढीव कोट्याच्या बिलापोटी 20 लाखांचा धनादेश एमआयडीसीचे उपअभियंता एन. जी. राठोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

निंबळकची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार आठ हजार 300 इतकी होती. आजची लोकसंख्या अंदाजे 20 हजारच्या घरात आहे, तर निंबळकला पाच लक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार पाणीपुरवठा अत्यल्प होता. यामुळे भीषण पाणी टंचाई जाणवत होती.

२१ वर्षांनंतर वाढीव कोटा मंजूर

2001मध्ये तत्कालीन सरपंच स्व. संजय भाऊसाहेब लामखडे यांनी तीन लाख लिटर पाण्याच्या कोट्यावरून पाच लाख लिटर पाण्याचा वाढीव कोटा मंजूर केला होता. यानंतर तब्बल 21 वर्षानंतर पाण्याचा वाढीव कोटा मंजूर करण्यात आला आहे. पाणी टंचाईमुळे पाण्याचा वाढीव कोटा मंजूर करण्यासाठी सरपंच प्रियंका लामखडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्यांनी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे निंबळकसाठी वाढीव कोटा मंजूर करण्यात आला.

यासाठी आमदार नीलेश लंके यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याची माहिती युवा नेते अजय लामखडे यांनी दिली. वाढीव कोटा मंजूर झाल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे गावाच्या विकासाला निश्चित चालना मिळणार असल्याचेही लामखडे यांनी सांगितले. वाढीव पाण्याच्या बिलापोटी एक कोटी 60 लाख रुपये ग्रामपंचायतीला भरावे लागणार आहेत. ते टप्प्याटप्प्याने नऊ वर्षांत भरण्यात येणार असून, त्यातील पहिला हप्ता 20 लाख रुपयांचा धनादेश सरपंच प्रियंका लामखडे व ग्रामविकास अधिकारी सविता लांडे यांनी एमआयडीसीकडे सुपूर्द केला. यामुळे सोमवारपासून निंबळकला वाढीव पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

निंबळकला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. महिला सरपंच म्हणून मला या समस्येची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही समस्या सोडवायचीच या उद्देशाने सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने पाठपुरावा केला आणि वाढीव कोटा मंजूर करून आणला. पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

                                                                   – प्रियंका लामखडे, सरपंच, निंबळक

निंबळकला लोकसंख्येच्या मानाने पाणीपुरवठा अत्यल्प प्रमाणात होत होता. सरपंच प्रियंका लामखडे व सर्व सदस्यांनी पाठपुरावा करून वाढीव कोटा मंजूर केल्याने पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ग्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

                                                                       -राजू रोकडे, माजी सदस्य, निंबळक

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news