

जामखेड, पुढारी वृतसेवा : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील 200 पेक्षा जास्त कामांवर शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती आणली आहे. ही कामे बजेटमध्ये घेऊन मंजूर केलेली असताना देखील सरकारने त्यांना स्थगिती देत आगळावेगळा निर्णय घेतला आहे. मी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय त्यांनी घेऊ नये, असा टोला आमदार रोहित पवार यांनी विरोधकांना लगावला आहे.
आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून जवळा व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जवळेश्वर मंदिरातील भिंतींना प्राचिन व ऐतिहासिक रूप देण्यासाठी 10 लाख रुपयांचा निधी देत, त्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आ. पवार बोलत होते. ते म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या सर्वच कामांना स्थगिती दिली आहे. त्यामध्ये कर्जत-जामखेडच्या 200 पेक्षा जास्त मंजूर कामांचा समावेश आहे. या कामांमध्ये जवळा ते बोर्ले रस्त्यासाठी 8 कोटींच्या कामाला मंजुरी मिळाली असून, ते काम निविदा प्रक्रियेमध्ये आहे. परंतु, या सरकारने या कामालाही स्थगिती दिली आहे.
त्यामुळे हा महत्त्वाचा रस्ताही त्यामध्ये अडकला आहे. सरकारने शेतकर्यांच्या हिताच्या रस्त्याबाबत राजकारण बाजूला ठेवून निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम मार्गी लावावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच काकासाहेब वाळूंजकर, माजी उपसभापती दीपक पाटील, स्वाभिमानी चे तालुकाध्यक्ष मंगेश आजबे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष शरद शिंदे, राहुल पाटील, चौंडीचे सरपंच सुनील उबाळे, ग्रा. पं. सदस्य दयानंद कथले आदींसह नागरिक उपस्थित होते.
मी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये. तसा प्रयत्न जरी केला तरी जनतेला सर्व माहिती आहे की, कोणी, किती व कोणती कामे मंजूर केली आहेत. या कामांची स्थगिती उठविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे या कामांवरील स्थगिती लवकरच निघेल, अशी अपेक्षा आहे.