नगर : धावपटूंचं नगर…स्वप्न दुरापास्त!

नगर : धावपटूंचं नगर…स्वप्न दुरापास्त!
Published on
Updated on

नगर, अलताफ कडकाले : नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांचा विचार करता पाचही जिल्ह्यात खेळांचा विकास म्हणावा तसा झालेला नाही. खेळसंस्कृती चांगली रुजलेली असताना नगर पुरता विचार केला, तर नगर कुठेही उजवे नाही. धावपटूंचं शहर बनण्याचे स्वप्न उराशी घेऊन इथला प्रत्येक खेळाडू धावत असतो; परंतु या धावपटूंच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आवश्यकता आहे, ती म्हणजे सिंथेटिक ट्रॅकची…आता ही मागणी जोर धरताना दिसू लागली आहे. सिंथेटिक ट्रॅक झाला, तर नगरचेही धावपटू इतरांबरोबर स्पर्धा करू शकतील, अशी आशा प्रशिक्षकांनी क्रीडादिनानिमित्त 'पुढारी'शी बोलताना व्यक्त केली.

आज 29 ऑगस्ट म्हणजेच, हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. देशाभारात क्रीडा दिन म्हणून हा दिवस आयोजित केला जातो. नगर जिल्ह्यात एकही सिंथेटिक ट्रॅक नसल्याची खंत सचिव व प्रशिक्षक दिनेश भालेराव यांनी व्यक्त केली.

राज्यात होणार्‍या मैदानी स्पर्धा सिंथेटिक ट्रॅकवरच होतात. महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या स्पर्धा किंवा राज्य शालेय मैदानी स्पर्धा सिंथेटिक ट्रॅकवरच आयोजित केल्या जातात. नगर जिल्ह्यात सिंथेटिक ट्रॅक नसल्याने धावपटूंना सराव करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नगरचे सर्वच धावपटू सध्या मातीच्या मैदानावर सराव करतात. मड ग्राऊंडवर सराव करणारे खेळाडू राज्य स्पर्धेत सरळ सिंथेटिक ट्रॅकवर धावल्यामुळे ते अनेक वेळा घसरून पडले आहेत.

मातीच्या सरावामुळे त्यांना सिंथेटिक ट्रॅकवर धावणे अडचणीचे जाते. यामुळे नगर जिल्ह्यातील खेळाडूंना अपयश येते. नगर जिल्हा आजपर्यंत अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पदक खेळाडू आहेत. तरीसुद्धा आजपर्यंत जिल्ह्यात एकही सिंथेटिक ट्रॅक निर्माण झालेला नाही, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. साखर कारखान्याचा मोठा जिल्हा असूनही, तसेच आजपर्यंत या जिल्ह्यात खूप मंत्री होऊन गेले, तरीही जिल्ह्यामध्ये क्रीडा संकुल उपेक्षितच राहिलेले आहे. वाडिया पार्क येथे सिंथेटिक ट्रॅकची मागणी अहमदनगर जिल्हा अ‍ॅॅथलेटिक संघटनेकडून लावून धरली आहे. यासाठी वारंवार पत्रव्यवहार करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सिंथेटिक ट्रॅकसाठी वारंवार पत्रव्यवहार

वाडिया पार्कच्या मैदानावर धावपटूंसाठी सिंथेटिक ट्रॅक बनविण्यात यावे, अशी मागणी तत्कालीन क्रीडामंत्री सुनील केदारे यांना करण्यात आली होती. यासंदर्भात त्यांना पत्र देण्यात आले होते. नगरचे वाडिया पार्कचे मैदान राज्यात दोन नंबरचे मोठे मैदान असून, यासाठी 400 मीटरचा सिंथेटिक ट्रॅक निर्माण करावा. या ट्रॅकअभावी खेळाडू पुणे, मुंबईकडे जातात. त्यामुळे या खेळाडूंना नगर जिल्ह्यातच सुविधा मिळाली, तर चांगली प्रगती करतील आणि नगरचे नावलौकिक वाढवतील, अशी आशा प्रशिक्षक दिनेश भालेराव यांनी बोलताना व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news