

काष्टी, पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा तालुक्यातील पेडगावच्या धर्मवीरगडावर टीम धर्मवीरगड व शिवदुर्ग संवर्धनच्या धारकर्यांनी भीमानदी काठी जीर्णोद्धार केलेल्या पाताळेश्वर महादेवाचा 400 वर्षानंतर पूनर्स्थापना प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महादेवाच्या पिंडीला फुलांची आर्कषक सजावट केली होती.
या सोहळ्याला महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक मावळे धर्मवीरगडवर आले होते. रविवारी (दि. 14) सायंकाळी पाच वाजता पेडगावतून मी दौंडकर ढोलताशांच्या गजरात व स्वयंभू हलगीच्या तालात मराठमोळे वाद्य वाजवून पालखी सोहळ्यास सुरुवात झाली. शिवप्रतिष्ठानच्या दुर्गामाता दौडी प्रमाणे प्रथम भगवा ध्वज सर्व देवतांना आमंत्रण द्यायला गेला. रात्री 10 वाजता देवीचा गोंधळ पार पडला.
हा गोंधळ किल्ल्यावर इतिहासात दुसर्यांदा घडला. शंभूराजे दिलेरखानाच्या छावणीत असताना हिंदू सरदार एक करण्यासाठी महाराजांनी हा गोंधळ घातला होता. त्याचीच ही पुनरावृत्ती दुसर्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला सकाळी सहा वाजता अखिल गायत्री मंत्र परिवाराकडून रुद्राभिषेक व पाच कुंडी यज्ञ अभिषेक पार पडला. यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागातील 21 जोड्या अभिषेकासाठी बसल्या होत्या.
सोहळ्याला महाराष्ट्रातील दुर्गजागर प्रतिष्ठान, छत्रपती शंभूराजे परिवार, राजा शिवछत्रपती परिवार, शिववंदनेश्वर प्रतिष्ठान, शिवदुर्ग प्रतिष्ठान, स्वराज्यकार्य सर्व गडकिल्ले टीम, सह्याद्री प्रतिष्ठान, मी दौंडकर ढोलपथक, स्वयंभू हलगी पथक, महेश भय्या धाराशिवकर मित्र मंडळ, सोलापूर व मावळे उपस्थित होते.