

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील कोळेवाडी घाटात आज पहाटेच्या सुमारास दरोड्याच्या तयारीत असलेल्या महिलेसह अल्पवयीन मुलगा व नऊ जणांच्या टोळीला पोलिस पथकाने पाठलाग करून पकडले. दरम्यान, त्यांच्याकडून सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करून, त्यांना ताब्यात घेतले आहे.
पहाटेच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील कोळेवाडी घाटात काही इसम दरोडा घालण्याच्या तयारीत फिरत आहेत, अशी गुप्त खबर पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त खबर्यामार्फत मिळाली. या खबरीवरून पो. नि. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. चारूदत्त खोंडे, पो. ना. रामनाथ सानप, चालक खेडकर व पोलिस पथकाने काही गावकर्यांच्या मदतीने कोळेवाडी घाटात छापा टाकला. यावेळी अंधारात लपून बसलेले संशयित पोलिसांना पाहून पळू लागले. पोलिस पथक व गावकर्यांनी पाठलाग करून त्यांच्या मुसक्या आवळून ताब्यात घेतले.
संभाजी शिवाजी पाटील (वय 34 वर्षे, रा. देड, ता. शिराळ, जि. सांगली), राहुल लहू डोंगरे (वय 32 वर्षे, रा. मातेगाव, जि. बीड), अमोल संपत शिंदे (वय 33 वर्षे, रा. खांबे, ता. संगमनेर), सोमनाथ शिवराम आगीवले (वय 30 वर्षे,), अंकुश लक्ष्मण मेंगाळ (वय 25 वर्षे), तुळशीराम दामू मेंगाळ (वय 35 वर्षे), 7) बाळू शिवराम आगीवले (वय 21 वर्षे, सर्व रा. ठाकरवाडी, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद), कल्पना अमोल शिंदे (वय 25 वर्षे, रा. खांबे, ता. संगमनेर), तसेच बीड जिल्ह्यातील गेवराई येथील एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा अशा एकूण नऊ जणांची टोळी पोलिसांनी ताब्यात घेतली.
त्यांच्याकडून 2 लाख रुपये किमतीची लाल रंगाची तवेरा, दोन दुचाकी, पाच मोबाईल, गज, पक्कड, सुरा, दोरी, मिरची पूड असा एकूण 2 लाख 56 हजार 610 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या घटनेबाबत हवालदार जानकीराम कुशाबा खेमनर यांच्या फिर्यादीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा करीत आहेत.