

उंबरे, पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अडचणीत आहेत. अशावेळी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहण्याऐवजी खासदार सदाशिव लोखंडे हे त्यांना सोडून गेले आहेत. त्यामुळे तमाम शिवसैनिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. खासदार लोखंडे यांनी अजूनही झालं गेलं विसरून पुन्हा यावे, अन्यथा शिवसैनिक त्यांना शिर्डी मतदारसंघात फिरू देणार नाहीत, असा इशारा सेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे.
पै. खेवरे म्हणाले, शिवसेनेने माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकाला ओळख दिली आहे. मान-सन्मान दिला आहे. त्यामुळे मी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेना आणि ठाकरेंसमवेत राहणार आहे. मात्र, ज्या लोखंडेंना स्थानिक विरोध असतानाही उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली, शिवसैनिकांनीही आदेश पाळताना अवघ्या 17 दिवसांत जीवाचे रान करून त्यांना निवडून आणले. त्यांनी आज पक्षाचा, पक्षप्रमुखांचा आणि जनतेचाही मोठा विश्वासघात केला आहे. लोखंडे हे रहायला मुंबईत आहेत. मात्र, तरीही त्यांना जनतेने शिर्डीतून खासदार केले. असे असतानाही त्यांनी मतदारसंघात कोणतेही भरीव काम केलेले नाही, त्यातच नेत्यांशीही धोकेबाजी केली. त्यामुळे त्यांच्यावर आता जनतेही कितपत विश्वास ठेवावा, हा प्रश्न उभा राहिला आहे.
पक्ष बदलल्यानंतर जनता माफ करत नाही, हा इतिहास आहे. अशीच चूक वाकचौरे यांनी केली होती. त्यांनाही जनतेने घरी बसवले. त्यामुळे खासदार लोखंडे यांनी पुन्हा यावे, त्यांचे स्वागतच करू, असेही खेवरे यांनी स्पष्ट केले.
खासदार सदाशिव लोखंडे हे मतदारसंघात दोनवेळा खासदार झाले. त्यांनी एकाही शिवसैनिकासाठी मोठे काम केले नाही. जनतेचाही भ्रमनिरास झाला आहे. त्यांनी कोणतेही भरीव काम केलेले नाही. उलट, कोट्यवधींची बेहिशेबी संपत्ती जमा केली आहे. प्रसंगी याप्रकरणी चौकशी करावी, यासाठी मी पाठपुरावा करणार असल्याचेही जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी स्पष्ट केले.
शिवसेना आणि ठाकरे घराण्याशी मी प्रामाणिक आहे. त्यामुळे पक्ष आणि माझे पक्षप्रमुख अडचणीत असल्याने मी आणि माझे तमाम शिवसैनिक रात्रीचा दिवस करून प्रतिज्ञापत्र करत आहोत. उत्तरेतून सुमारे 4 हजार प्रतिज्ञापत्र आम्ही सादर केले आहेत. आणखी दोन हजार प्रतिज्ञापत्र शेवटच्या टप्प्यात असून, तेही लवधरच दिले जातील, अशी माहिती पुढे येत आहे.