

चांदेकसारे, पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक येथे गेल्या दहा वर्षांपासून गावात क्षारयुक्त पाणी असल्याने तत्कालीन सरपंचांनी आरो प्लान्ट जलशुद्धीकरण केंद्र स्थापन करून गावाला शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून डाऊच बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे जलशुद्धीकरण केंद्र बंद असून, याद्वारे अशुद्ध पाणी मिळत असल्याने नागरिकांना साथीचे आजार बळावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
जर येत्या दोन दिवसात या जलशुद्धीकरण यंत्राचे काम झाले नाही तर पंचायत समिती व तहसीलदार कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा डाऊच बुद्रुक ग्रामस्थांनी दिला आहे. गावात पाणी उपलब्ध असताना देखील अशुद्ध पाणी मिळाल्यामुळे गावाला चार ते पाच किलोमीटर इथून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. ही बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जलशुद्धीकरण यंत्राचा दरवाजा तोडत प्रवेश केला. यावेळी संपूर्ण यंत्र बिघाड झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
गेल्या दोन महिन्यांपासून गावाला अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. त्यांनी ग्रामसेवक महेश काळे यांना याबाबत विचारणा केली. यावेळी कोपरगाव बाजार समितीचे माजी उपसभापती भिवराव दहे, कल्याण दहे, जगन्नाथ दहे,पाराजी ढमाले, दिलीप दहे, अशोक पगारे , निलेश दहे, ढमाले कल्याण, शिवाजी दहे, भाऊसाहेब होन, बाबासाहेब होन,रतन दहे, भानुदास दहे,रामा जाधव, सुभाष बढे, शिवाजी बढे अदी उपस्थित होते.
ग्रामसेवक महेश काळे यांनी सांगितले की, जलशुद्धीकरण यंत्राचे काम चालू असून लवकरच गावकर्यांना शुद्ध पाणी मिळेल.तर भिवराव दहे यांनी ग्रामपंचायती दुर्लक्षामुळेच या जलशुद्धीकरण यंत्राचा बिघाड झाला असून, संबंधित ठेकेदाराला या जलशुद्धीकरण यंत्राचे काम तातडीने करायला लावले असते तर अशी परिस्थिती उद्भवली नसती जर या यंत्राची दोन दिवसांत दुरुस्ती झाली नाही तर गावकर्यांना घेऊन तहसील व पंचायत समिती समोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
याबाबत ग्रामपंचायतचे उपसरपंच दत्तात्रय दहे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे जलशुद्धीकरण यंत्राला पाणीपुरवठा करणार्या विहिरीमध्ये पुराचे पाणी गेले असल्याने त्या पाण्याचा टीडीएस वाढला आहे. त्यामुळे हे जलशुद्धीकरण यंत्र खराब झाले. संबधीत जलशुद्धीकरण यंत्र ठेकेदाराला चालवण्यास दिले असून त्याच्या दुरुस्तीचे कामही प्रगतिपथावर आहे. सोमवारी दुपारपर्यंत या जलशुद्धीकरण यंत्रातून डाऊच बुद्रुक गावाला शुद्ध पाणीपुरवठा होईल. मात्र राजकीय हेतूने स्टंटबाजी करून ग्रामपंचायतीला विरोधकांनी दोषी धरू नये, असे त्यांनी सांगितले. दोन दिवसात जर गावाला शुद्ध पाणी मिळाले नाही तर या विरोधात तहसील कार्यालय व पंचायत समिती समोर उपोषण इशारा देण्यात आला.