नगर : झेडपीसाठी अनेक इच्छुक बोहल्यावर! जिल्ह्यात गटा-गटात राजकारण तापलं

नगर : झेडपीसाठी अनेक इच्छुक बोहल्यावर! जिल्ह्यात गटा-गटात राजकारण तापलं

नगर; पुढारी वृत्तसेवा: जिल्हा परिषदेच्या 85 गटांच्या आरक्षण सोडतीनंतर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. कोणत्या गटात कोण-कोण इच्छुक, कोणाचे पारडे जड, कोणाला मिळणार उमेदवारी, कसे असेल बेरजेचे राजकारण, याविषयी आतापासूनच गावच्या पारावर गप्पा रंगू लागल्याचे चित्र आहे. राज्यातील सत्ता बदलानंतर मिनी विधानसभेची निवडणूक ही चुरशीची आणि तितकीच प्रतिष्ठेची बनली आहे. नुकतीच 85 गटांची सोडत झाली आहे. गेल्या पाच वर्षांत आपापल्या गटात मोठी विकासकामे करून, 70 इच्छुकांनी पुन्हा झेडपीत जाण्याची तयारी केली होती.

मात्र, कालच्या सोडतीमध्ये आपल्या हक्काच्या गटात 'आरक्षण' पडल्याने ऐनवेळी अनेक राजकीय मल्लांना आखाड्यातून बाहेर पडावे लागले. तर, आरक्षणामुळे मात्र या ठिकाणी निष्ठावंतांची 'लॉटरी' लागली आहे. एकूण 85 गटांपैकी 11 अनुसूचित जाती आणि 8 अनुसूचित जमाती हे 19 गट सोडले, तर सर्वसाधारण 44 आणि ओबीसींच्या 22 अशा उर्वरित 66 गटांत 'काटे की टक्कर' पाहायला मिळणार आहे. सोडतीनंतर सर्वसाधारण आणि ओबीसी इच्छुकांनी आपल्या सोयीच्या आणि सुरक्षित गटात मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

गटांत नवीन समाविष्ट झालेली गावे, तेथील ग्रामपंचायत, सोसायटी, गावपुढार्‍यांचा आढावा घेतला जात आहे. गावातही आपल्या गटात कोणाची हवा, कोण कोण इच्छुक, कोणाला उमदेवारी मिळणार, कोणाला कसा फायदा होणार, कोण कोणाचे काम करणार, याविषयी आतापासूनच आडाखे बांधले जाऊ लागले आहेत. गावोगावच्या चहा टपरीवर आणि पारावर अशा राजकीय गप्पा कानावर येऊ लागल्या आहेत.

पुन्हा एकदा कुणबी कार्ड!
गेल्या पाच वर्षांपूर्वी झेडपीत ओबीसींसाठी 20 जागा राखीव होत्या. संबंधित गटांत निवडणुका होऊन त्यातून मिनी मंत्रालयात आलेल्या सदस्यांमध्ये 18 पेक्षा अधिक हे 'कुणबी' कार्डवर जिंकले होते. त्यामुळे आताही ओबीसींच्या 22 जागांवर 'कुणबी' लढती रंगणार आहेत. त्यासाठी सोडत झाल्यानंतर अनेकांनी ओबीसीतील कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र आहे.

निष्ठा आणि 'सोधा' पॅटर्न!
सर्वसाधारण आणि ओबीसी गटातून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढतीच आहे. त्यामुळे उमेदवारी वाटप करताना श्रेष्ठींची डोकेदुखी वाढणार आहे. मात्र, उमेदवारी देताना श्रेष्ठी निष्ठावंतांना संधी देणार आहेत. याशिवाय गटातील त्याचा सोयरेधायरेही विचारात घेतले जाणार आहेत. त्यामुळे आतापासूनच इच्छुकांनी अशापद्धतीने बांधणी सुरू केली आहे. गटांतील गावांत आपले कुठे कुठे पाहुणे याची उजळणी सुरू केली आहे. यातून भेटीगाठीही सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news