

नगर : पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाने अन्नधान्य व खाद्य वस्तूवर 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतल्याने, जिल्ह्यातील व्यापार्यांमध्ये सरकारच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली आहे. या कराविरोधात 16 जुलैला पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये नगरचे व्यापारी सहभागी होणार आहेत.
या निर्णयाच्या विरोधात मंगळवारी (दि.12) शहरातील व्यापार्यांनी वस्तू व सेवा कर भवन येथे जाऊन राज्यकर उपायुक्त मनोज मगर यांना यासंदर्भात निवेदन दिले. केंद्र सरकारने अन्नधान्यासह जीवनावश्यक खाद्य वस्तंवर लावण्यात आलेला 5 टक्के जीएसटी रद्द करावा. अन्यथा येत्या 16 जुलै रोजी व्यापारी भारत बंद करणार आहेत, असा इशारा अहमदनगर व्यापारी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी व्यापारी संतोष बोरा, राजेंद्र बोथरा, अशोक गांधी, अशोक भंडारी, सतीश गुंदेचा, संजय लोढा, सुरेश भंडारी, गोपाळ मणियार, राजकुमार शेटिया, अतुल शेटिया, रितेश पारिक, संजय लोढा, राकेश मेहतानी, प्रेमराज पितळे, दीपक बोथरा, प्रकाश फिरोदिया, शिवकांत हेडा आदी उपस्थित होते.
व्यापार्यांनी निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने 2017 साली व्यापार्यांना सांगितले होते की, अन्नधान्य व खाद्यवस्तूवर जीएसटी लावण्यात येणार नाही. या सर्व वस्तू यापूर्वी करमुक्त होत्या. त्यानंतर ब्रँडेड वस्तूंवर कर लावण्यात आला. आता तर अन्नधान्य व खाद्य वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लावल्यामुळे व्यापार्यांसह शेतकरी व सर्वसामान्य जनता होरपळून निघणार आहे. या निर्णयाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र स्वरूपाची संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे जीएसटीचा निर्णय रद्द करण्याची मागणी व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
पूर्वी जीवनावश्यक खाद्य वस्तूंवर कुठलाही प्रकारचा कर नव्हता. मात्र, येत्या 18 जुलैपासून या वस्तूंवर कर लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार पॅकिंग केलेल्या आणि लेबल लावलेल्या डाळी, कडधान्ये, आटा, रवा, मैदा, दुधाचे पदार्थ या सर्व वस्तूंवर आता 5 टक्के जीएसटी लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.