नगर जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकाने होणार आयएसओ; राज्य शासनाचा संकल्प

नगर जिल्ह्यातील स्वस्तधान्य दुकाने होणार आयएसओ;  राज्य शासनाचा संकल्प

नगर; पुढारी वृत्तसेवा: गोरगरीब जनतेला धान्य वाटप करणार्‍या स्वस्तधान्य दुकानांचे रुपडे बदलणार आहे. या दुकानांना आता आयएसओ दर्जा मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाची धावपळ सुरू आहे. राज्याच्या पुरवठा विभागाच्या वतीने गोरगरीब जनतेला रेशनकार्डवर दरमहा अत्यल्प दराने स्वस्तधान्य दुकानांतून धान्य, तांदूळ व साखर वितरित केले जात आहे. दोन दशकांपूर्वी रेशनकार्डवर ओळख न पटविता धान्य दिले जात होते. धान्य वाटप कधी सुरू होते आणि कधी बंद होत असे, याचा पत्ता लागत नव्हता. त्यामुळे या स्वस्तधान्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असे. याबाबत अनेक तक्रारी जिल्हा पुरवठा विभागाकडे येत असे. परंतु पुराव्याअभावी कोणावर सहसा कारवाई होत नव्हती.

गेल्या काही वर्षांपासून जगभरात आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले. या तंत्रज्ञानाचा फायदा घेत सरकारने व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड सक्तीचे केले. त्यानंतर स्वस्तधान्याचा वाढता काळाबाजार रोखण्यासाठी प्रत्येक स्वस्तधान्य दुकानांत पॉस मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनव्दारे लाभार्थ्यांची ओळख पटणे आता सोपे झाले. त्यामुळे आता पात्र लाभार्थ्यांनाच धान्य मिळत आहे. याशिवाय दुकानात वाटपाअभावी किती धान्य उपलब्ध आहे. याची माहिती राज्य सरकारला उपलब्ध होऊ लागली आहे. मध्यंतरी राज्य शासनाने रेशनकार्डला आधार कार्ड जोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्हाभरात आधारजोडणीचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. आजमितीस 99 टक्के रेशनकार्डधारकांची आधार जोडणी झालेली आहे.

या जोडणीमुळे रेशनकार्डधारला दुबार व इतरत्र धान्य उचलता येणार नाही. राज्य पुरवठा विभागाने आता गावागावांतील स्वस्तधान्य दुकाने हायफाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सार्वजनिक वितरण प्रणालीस आता आयएसओ दर्जा देण्याचा संकल्प हाती घेतला आहे. तालुकाहस्तरीय पुरवठा विभाग, तालुकास्तरीय गोदाम व स्वस्तधान्य दुकान या तीनस्तरावर आयएसओचे कामकाज सुरू असल्याचा निर्वाळा जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिला आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 884 स्वस्तधान्य दुकाने आहेत.या दुकानांना आयएसओ दर्जा प्राप्त करण्यासाठी आता प्रत्येक दुकानदाराना ड्रेसकोड तसेच ओळखपत्र उपलब्ध होणार आहे.

याशिवाय दुकानांचे सुशोभीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. दुकानात अद्ययावत नोंदवही, विविध प्रकारचे रजिस्टर आदी उपलब्ध होणार आहे. दुकानांची स्वच्छता आणि टापटीपपणा कायम ठेवला जाणार आहे. लाभार्थ्यांसाठी या दुकानांत बैठक व्यवस्था असणार आहे. दुकानात उंदीर व घशींचा सुळसुळाट असल्याने, धान्याची नासाडी होते. हा प्रकार रोखण्यासाठी आता दुकानात पिंजरा देखील ठेवला जाणार आहे. सर्वच स्वस्तधान्य दुकानांना एकच रंग असणार आहे. त्यामुळे आता सर्व दुकाने हायफाय दिसणार आहेत.

आयएसओसाठी कामाला लागा
जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी नुकतीच तालुकास्तरीय पुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची बैठक घेतली. आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक ते बदल करावे लागणार आहेत. त्यासाठी स्वस्तधान्य दुकानदारांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. आयएसओ दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती कामगिरी करण्यासाठी प्रत्येकानी पुढाकार घ्यावा अशा सूचना यावेळी करण्यात आली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news