नगर : जिल्ह्यात खरिपाची 64 टक्के पेरणी

नगर : जिल्ह्यात खरिपाची 64 टक्के पेरणी

नगर : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने खरीप पेरण्यांना गती मिळाली. त्यामुळे काल गुरुवार, दि.7 जुलै अखेर 2 लाख 86 हजार 530 हेक्टरवर 64 टक्के इतकी पेरणी झाली आहे. यामध्ये कपाशीचे क्षेत्र 85 हजार हेक्टर, तर सोयाबीन 65 हजार हेक्टरवर घेण्यात आले आहे.

यावर्षी मान्सूनने हुलकावणी दिल्याने खरीप पेरण्या, लागवडींना काहीसा उशीर झाल्याचे दिसले. त्यातही शेतकर्‍यांना भुसार पिकांऐवजी नगदी पिकांकडे कल असल्याचेही प्रकर्षाने जाणवले. त्यामुळे बाजरीसह अन्य पिके कमी होताना दिसले, तर कपाशी, सोयाबीन वाढलेले पहायला मिळत आहे.

जिल्ह्यात कपाशीचे 1 लाख 14 हजार सरासरी क्षेत्र आहे. यापैकी 85 हजार 108 हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे, तसेच सोयाबीनचे क्षेत्र हे 55 हजार हेक्टर कृषी विभागाने गृहीत धरले होते. परंतु, शेतकर्‍यांचा वाढता कल पाहता यावर्षी सोयाबीनने 65 हजार हेक्टरवर पेरणी केली आहे. बाजरी पेरणीसाठी शेतकर्‍यांचा प्रतिसाद कमीच आहे.

बाजरीचे 1 लाख 40 हजार हेक्टरचे उद्दिष्ट असताना, कालअखेर बाजरीची 36 हजार 389 हेक्टरवर पेरणी झाली आहे. तुरीने यंदा सरासरी ओलांडली आहे. यावर्षी 15 हजार 121 हेक्टर तुरीचे अंदाजित क्षेत्र होते. प्रत्यक्षात 20 हजार 403 हेक्टरवर शेतकर्‍यांनी तूर घेतली आहे. पाऊस लांबल्याने यंदा मूग पेरणी मात्र खोळंबली होती. त्यामुळे मुगाचे क्षेत्र कमी होणार आहे.

यावर्षी मुगाचे सरासरी 40 हजार 378 क्षेत्र असून, प्रत्यक्षात 26 हजार 305 हेक्टरवर पेरणी झालेली आहे. तसेच 22 हजार 559 हेक्टरवर मका घेण्यात आलेली आहे. पेरणीचे क्षेत्र आणखी वाढणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामात मुगाच्या क्षेत्रात घट दिसते. तर कपाशीसोबतच सोयाबीनचे क्षेत्र वाढते आहे. 15 जुलैपर्यंत सोयाबीन पेरण्या करण्यासाठी अनुकूल वातावरण असेल, तर कपाशी लागवडीही सुरू राहतील. यावर्षी 100 टक्के खरीपाच्या पेरण्या होतील.

-शंकर किरवे
कृषी अधिकारी, जिल्हा परिषद.

पीक पेरणी टक्के

कपाशी 74
बाजरी 26
तूर 134
मूग 65
उडीद 137
मका 70
सोयाबीन 112

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news