नगर जिल्हा विभाजनासाठी काँग्रेस नेत्याच्या भेटीगाठी

नगर जिल्हा विभाजनासाठी काँग्रेस नेत्याच्या भेटीगाठी

नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा विभाजनानंतर निर्माण होणार्‍या नव्या मुख्यालयावरून सुरू असलेला वाद आणि विभाजन मंजुरीच्या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन जिल्हा विभाजन समितीचे निमंत्रक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी केले आहे. यासंदर्भात भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्याशी चर्चा करून देशमुख यांनी त्यादृष्टीने पाऊल टाकले आहे.

नगर जिल्हा विभाजनाला मान्यता देणारा ठराव तत्कालीन पालकमंत्री मधुकरराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात जिल्हा विभाजनाला मान्यता मिळालेली आहे. नव्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या वादात मातब्बर नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे निर्णयाची अंमल बजावणी होऊ शकली नाही. नगर दक्षिण भागाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र यावे, असे देशमुख यांचे म्हणणे आहे.

विस्तारामुळे नागरिकांवर अन्याय

अहमदनगर जिल्ह्यातील दोन टोकांच्या कर्जतचे सिध्दटेक ते अकोलेतील घाटघर गावांतील अंतर 250 किमी पेक्षा जास्त आहे. नगर उत्तर व दक्षिण भागाची स्थिती सर्वच बाबतीत अतिशय भिन्न आहे. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना लोकसंख्या नव्हे तर जिल्हा घटक धरून बनविलेल्या आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील लोकांवर मोठा अन्याय होतो. हे लक्षात घेता जिल्हा विभाजनाच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरीत होणे आवश्यक असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जिल्हा विभाजनाबाबत साकडे घालणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक पद्मभुषण अण्णासाहेब हजारे व पद्मश्री पोपटराव पवार यांनाही लक्ष घालण्याची विनंती करणार आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व प्रमुखांची भेट घेऊन त्यांनाही हे पटवून देवू.

                                              -विनायक देशमुख, निमंत्रक, जिल्हा विभाजन समिती

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news