भातकुडगाव, पुढारी वृत्तसेवा : चालू महिन्यात विक्रमी जलसाठा होऊन जायकवाडी (नाथसागर) जलाशय शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. आजमितीस धरणात जवळपास 80 टक्के पाणीसाठा झाल्याने धरणावर अवलंबून सर्वच क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, अशा जलाशयाकडेचे शेतकरी मात्र धास्तावले आहेत.
सलग तीन वर्षांपासून धरण साठा शंभर टक्के होत आहे. धरणातील गाळामुळे पाणीसाठा कमी होत चालला आहे. शंभर टक्के जलसाठा धरण प्रशासनाने धरल्यास धरणाचे पाणी धरणासाठी संपादित केलेल्या क्षेत्राबाहेर जाऊन असंपादित जमिनीवरील शेती पिकाचे नुकसान करीत आहे. याकडे जायकवाडी जल प्राधिकरण मात्र दुर्लक्ष करून शेतकर्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरत आहे.
धरणाचे पाणी असंपादित जमिनीत येऊन हजारो हेक्टरवर खरीप पिकांचे शेतकर्यांचे नुकसान झाले. त्यावर या शेतकर्यांनी आवाज उठविला. मात्र, निगरगठ्ठ प्रशासनाने एकमेकांकडे (जायकवाडी जल प्राधिकरण आणि महसूल विभाग) बोट दाखवून आपली जबाबदारी झटकल्याने आजपर्यंत बाधित शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. यात जादा तर शेतकरी हे नगर जिल्ह्यातील शेवगाव-नेवासा तालुक्यांतील असून आधीच धरणग्रस्त होऊन उरल्यासुरल्या जमिनी कसून आपला चरितार्थ चालवतात. मात्र, असंपादित क्षेत्रात धरणाचे पाणी येत असल्याने या शेतकर्यांची राहिलेली शेती ही धरणात जात असल्याने जमीन संपादित नसूनही शेतीत पाणी येत असल्याने धरणग्रस्त झाल्यागत परिस्थितीत आहेत.
जायकवाडी जलाशयाकडेच्या असंपादित क्षेत्रात धरणाचे पाणी येऊन सलग दोन वर्षे जोमदार खरीप पिके धरणाच्या पाण्यात गेल्याने जलाशयाकडेच्या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. हे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. यांच्या मदतीला त्यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मदतीसाठी प्रयत्न केले. मात्र, जायकवाडी जलप्राधिकरण आणि महसूल विभाग यांनी थांगपत्ता लागू दिला नाही, ही वस्तूस्थिती असून, शेतकर्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील असलेल्या लोकप्रतिनिधींनीही धरण प्रशासनापुढे हात टेकले आहे.
जायकवाडी जलाशय शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. जलसाठा अधिक झाल्यावर धरणाचे पाणी असंपादित जमीन घुसते. त्यामुळे शेती पिकाचे नुकसान होते. हे पाणी बरेच दिवस या जमिनीवर साठून राहत असल्याने शेतकर्यांना रब्बी हंगामातील पिके ही घेता येत नाही. यंदा ही जलाशय शंभर टक्के भरणार असल्याने मागिल वर्षी ची परिस्थिती परत उद्भवू शकते.