नगर : जामखेडच्या शहरांतर्गतील रस्ते खड्ड्यात

जामखेड : पावसामुळे शहरातील महाराष्ट्र बँकेकडे जाणार्‍या रस्त्याची झालेली दुरवस्था. (छाया : दीपक देवमाने)
जामखेड : पावसामुळे शहरातील महाराष्ट्र बँकेकडे जाणार्‍या रस्त्याची झालेली दुरवस्था. (छाया : दीपक देवमाने)
Published on
Updated on

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : शहरातील सदाफुले वस्तीवर जाणारा बँक ऑफ महाराष्ट्र व शिंदे हॉस्पिटल समोरील रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. अनेक नागरिक व वाहन चालक या रस्त्यावर पडल्याने छोटे-मोठे अपघात झाले आहेत. यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती कधी होणार? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

शहरातील महाराष्ट्र बँकेत कामानिमित्त व सदाफुले वस्ती, बीएसएनएल कार्यालयाकडे जाण्याचा मार्ग असल्याने या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात रहदारी आहे. या रस्तावरून वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते; परंतु अनेकवर्षांपासून या रस्त्याचे काम झालेले नाही. त्यामुळे या रस्त्यात मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. याकडे नगरपरिषदेचे लक्ष नसल्याने ही दुरवस्था झाली आहे. त्या खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचल्याने या रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना त्रस सहन करावा लागतो. सदाफुले वस्तीवरील रहिवाशांना जाण्या -येण्यासाठी मोठी कसरत करावी लागते.

नगर परिषदने टाकलेल्या मुरूम व्यवस्थित न टाकल्यामुळे अनेक वाहनधारक घसरून पडले; तर काहींना पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज न आल्याने पडले आहेत. यासाठी नगरपरिषदेने तत्काळ उपयोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली. या संदर्भात अनेक वेळा मुख्याधिकार्‍यांना फोन लावले; पण त्यांनी फोन उचलत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केली.

दोन आमदार, एक खासदार..तरी प्रश्न प्रलंबितच

कर्जत- जामखेड मतदार संघात आमदार रोहित पवार व विधान परिषदेचे आमदार राम शिंदे असे दोन आमदार आणि एक खासदार डॉ. सुजय विखे आहेत. परंतु, यांनीही मूलभूत प्रश्नांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. माजी मंत्री राम शिंदे पाच वर्षे आमदार, पाच वर्षे मंत्रीपद होते. यांनीही या महत्वाच्या रस्त्याचे काम मार्गी लावले नाही. 2019मध्ये आमदार रोहित पवार निवडून आले. गेल्या अडीच वर्षांत या महत्वाच्या रस्ता असतानाही तो झाला नाही. त्यामुळे या रस्त्याचा प्रश्न कधी मार्गी लागणार अका प्रश्न अनुत्तरितच आहे. तसेच, दक्षिणेची खासदार डॉ. सुजय विखे यांनी नगर – बीड रस्त्याकडेही दुर्लक्ष झाल्याने यामध्ये मोठे खड्डे पडले आहेत. दोन आमदार, एक खासदार असतानाही रस्त्याचा प्रलंबित राहत असेल, तर मार्गी लागणार का नाही? असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे.

खड्डे बुजवा, अन्यथा आंदोलन

महाराष्ट्र बँकेच्या रस्त्यामध्ये पावसाळ्यात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असून, या रस्त्याबाबत वारंवार नगरपरिषदेला माहिती देऊन ही कोणतीही कारवाई होत नाही. जर या रस्त्यातील पाणी काढणे व रस्त्यातील खड्डे दोन दिवसात खड्डे बुजविले नाही, तर 'आप'तर्फे आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हा उपाध्यक्ष संतोष नवलाखा यांनी दिला.

गेल्या दीड वर्षांपासून प्रशासक

नगरपरिषदेची मुदत गेल्या दीड वर्षांपासून संपली आहे; त्यामुळे प्रांत आधिकारीच प्रशासक असून, मुख्याधिकारी काम पाहतात; परंतु महत्वाच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देत नसल्याच्या तक्रारी नागरिकांमध्ये आहेत. याची दखल लोकप्रतिनिधी घेऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news