बोटा, पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील पठार भागातील जाचकवाडी गावाला 'जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल' नुसार नळ योजनेसाठी एक कोटी सत्त्याहत्तर लाख रुपये मंजूर झाले आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत 'हर घर नल से जल' प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबध्द आहे. सन 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई किमान 55 लिटर प्रतिदिन गुणवत्ता पूर्ण व सातत्याने पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात ही योजना पाणी व स्वच्छता समितीच्या पुढाकाराने राबविली जात आहे. या योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आहेत.
ही योजना जरी केंद्राची असून यासाठी केंद्राचा 50 टक्के आणि राज्याचा 50 टक्के वाटा अशी 'जल जीवन मिशन योजना' सध्या अहमदनगर जिल्ह्यात राबविली जात आहे. याच योजनेतून जाचकवाडी गावाला नळ योजनेसाठी तब्बल एक कोटी सत्त्याहत्तर लाख रुपयांचा निधी मिळाल्याने गावकर्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
जाचकवाडी ग्रामपंचायत यांचे प्रस्तावानुसार या योजनेचा सर्व्हे देखील झाला आहे. त्यास मान्यता देखील मिळाली. त्यामुळे गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. या योजनेतून गावातील घरोघर नळ जोडणी करून ही 'हर घर जल योजना' राबविली जाणार असल्याने ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला आहे.
जाचकवाडी गावाला मार्च, एप्रिल महिन्यात पिण्यासाठी पाणी कमी पडत होते. गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वण- वण करावी लागत होती. या जल जीवन मिशन योजनेच्या माध्यमातून गावासाठी नळ योजनेला भरघोस निधी मिळाला आहे. या योजनेतून गावातील मळे, वस्तीवर नळ कनेक्शन देऊन बारामाही नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. या योजनेचा गावासाठी चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. त्यामुळे गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही, असे ग्रामविकास अधिकारी वैभव गायकवाड यांनी सांगितले.
माझ्या गावच्या विकासासाठी आम्ही कायम प्रयत्नशील राहत आहोत. ग्रामस्थांच्या प्रस्तावानुसार या नळ योजनेची मागणी ग्रामपंचायत माध्यमातून केली होती. ग्रामपंचायतने त्यानुसार प्रस्ताव देखील वरिष्ठ पातळीवर पाठवला होता.त्यानुसार जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजनेचा सर्व्हे देखील झाला आणि त्यास मान्यता देखील मिळाली. या योजनेसाठी गावाला भरघोस असा निधी मिळाला असल्याने गावकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
– संगीता महाले, सरपंच
जल जीवन मिशन अंतर्गत 'हर घर जल' ही योजना चांगली असून गावच्या ग्रामस्थांची देखील मागणी होती. या मागणीनुसार आम्ही ग्रामपंचायतीचा माध्यमातून पाठपुरावा केला. गावकर्यांच्या मागणी प्रस्तावाला मान्यता देखील मिळाली. तसेच भरघोस निधी मिळाल्याने गावातील प्रत्येक घरात पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. त्यामुळे आमच्या गावचा पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याने गावकरी देखील समाधान व्यक्त करत आहे.
– योगेश महाले, उपसरपंच