नगर : जनावरांमध्ये फण्या, लम्पीचा शिरकाव

नगर : जनावरांमध्ये फण्या, लम्पीचा शिरकाव

नगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात जामखेड आणि अकोले तालुक्यात जनावरांमध्ये फण्या व लम्पी रोगाचा शिरकाव झाल्याने जिल्हा परिषद आरोग्य विभाग अलर्ट झाला आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकार्‍यानीही याबाबत गंभीर दखल घेत जनावरांच्या बाजारात लसीकरण व टॅग असल्याशिवाय पशुधन विक्रीस थेट बंदीचे आदेश काढले आहेत.

औंध (पुणे) येथील पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त (रोग अन्वेषण विभाग) यांनी नगर जिल्ह्यातील जामखेड व अकोले (मौजे गर्दनी) तालुक्यात अनुक्रमे फण्या व लम्पी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास आणलेले आहे. लम्पी रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून 5 किलोमीटर परिसरातील टाकळी, आगर व खानापूर ही गावे सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्राण्यांमधील संक्रमक व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये जिल्ह्यातील बाधित व अबाधित पशुधनास आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक लसीकरण करणे बंधनकारक आहे.

या संदर्भात जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ सुनील तुंभारे, जि.प. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कुमकर यांनी वरिष्ठ विभागाकडे कार्यालयीन टिप्पणी दिली होती. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अध्यक्ष डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकिय संस्था प्रमुख यांनी पशुधनास रोगप्रतिबंधक लसीकरण करावे, तसेच जिल्ह्यातील पशु बाजारामध्ये (कृषि उत्पन्न बाजार समिती ग्रामपंचायत/प्रक्षेत्रे) यापुढे टॅगिंग व रोग प्रतिबंधक लसीकरणाची खात्री झाल्याशिवाय खरेदी-विक्री होऊ देवू नये, असे आदेश काढले आहेत. जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ कुमकर यांनी तशा पद्धतीने सूचना केल्या आहेत. दरम्यान, सध्या जामखेड, अकोलेत असलेला फण्या व लिम्पीचा जिल्हाभरातील शेतकर्‍यांनी धसका घेतल्याचे चित्र आहे.

'हे' बाजार प्रशासनाच्या रडारवर

जिल्ह्यामध्ये लोणी, घोडेगाव आणि काष्टी येथे जनावरांचे बाजार भरले जातात. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आता संबंधित बाजारात टॅग व लसीकरण खात्री केल्यानंतरच जनावरे विक्रीसाठी आणता येणार आहेत. प्रशासनाच्या या निर्णयामुळे जनावरांमधील रोगांचा वाढता प्रादुर्भाव रोखता येणार आहे.

फण्या आणि लिम्पि आजार प्रतिबंधक म्हणून पशुसंवर्धन विभागाने सीईओ आशिष येरेकर व अतिरिक्त सीईओ संभाजी लांगोरे, उपायुक्त डॉ तुंभारे यांच्या मार्गदर्शनात 4 लाख 90 हजार जनावरांना फर्‍या प्रतिबंधक लसीकरण केले आहे, तसेच अकोले तालुक्यात लम्पि पादृभाव असलेल्या भागात 2100 जनावरांचे लसीकरण केले आहे. त्यामुळे प्रशासन योग्य ती काळजी घेत असून, शेतकर्‍यांनाही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

                                               – डॉ. संजय कुमकर, पशुवैद्यकीय अधिकारी, जि. प.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news