नगर : चक्क आरोपीने थाटले पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

नगर : चक्क आरोपीने थाटले पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र

कोंभळी, पुढारी वृत्तसेवा : गेल्या 14 वर्षांपासून फरार संशयित आरोपीने नांदेडमध्ये पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा संशयित मुळचा कर्जत तालुक्यातील मुळेवाडीचा असून, 20 वर्षांपूर्वी कर्जत तालुक्यातील अनेक लोकांना फसवून तो पसार झाला होता.

विशेष म्हणजे नांदेडला त्याने सुरू केलेल्या पाटील पोलिस प्रशिक्षण अकादमीत सध्या 100 हून अधिक जण प्रशिक्षण घेत होते, अशी चर्चा आहे. संशयिताला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. संतोष चंद्रभान मुळे, असे या संशयिताचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पंचवटी पोलिस ठाण्यात 2008 मध्ये या आरोपीविरोधात तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार संशयित संतोष मुळे याने महापालिका, जिल्हा परिषद आणि शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष देत बेरोजगारांना अंदाजे 51 लाखांना फसवले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फरार झाला होता. संशयिताने नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोकुंदा गावात पाटील अकादमी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र सुरू केल्याचे आढळल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. वरिष्ठ निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विलास गिसाडी यांनी ही कारवाई केली. आरोपीचे शिक्षण नाशिकमध्ये झाले असून, त्याने एमएससी इलेक्ट्रॉनिकचे शिक्षण घेतले आहे. नाशिकमधील क्रांतीनगर पंचवटी येथे तो भाडेतत्त्वाने राहत होता.

संतोष नाव बदलून राहायचा

पोलिस निरीक्षक विलास गिसाडी यांच्या पथकाने नांदेड पोलिसांच्या मदतीने संशयिताचा माग काढला. प्रशिक्षण केंद्रात संशयिताला अटक केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संतोष मुळे हा गोकुंदा गावी भरतीपूर्व पोलिस प्रशिक्षण केंद्र चालवत होता. स्वतःचे नाव बदलून संतोष मुळे पाटील म्हणून तो तिथे वास्तव्यास होता. आजवर अनेकांना त्याने प्रशिक्षण दिले आहे. गेल्या सात वर्षांपासून तो केंद्र चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने मुळेला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news