

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : नेवासा तालुक्यातील घोडेगाव तालुका निर्मिती प्रस्तावाची शासकीय चौकशी पूर्ण झाली आहे. आता त्याबाबत शासनाच्या निर्देशांची प्रतीक्षा असल्याची माहिती फुले-शाहू-आंबेडकर चळवळीतील बहुजन नेते सुधीर वैरागर यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना वैरागर यांनी सांगितले की, नाशिक विभागीय आयुक्तांच्या निर्देशांनुसार नेवासा येथील तहसीलदारांनी घोडेगाव तालुका निर्मिती प्रस्तावाची सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण केली आहे. घोडेगाव तालुक्याची निर्मिती केल्यास सर्वसामान्य जनतेचे श्रम, वेळ, पैसा वाचणार असल्याच्या शिफारशीचा प्रस्ताव त्यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे.
घोडेगाव तालुक्यात प्रस्तावित केलेल्या 53 ग्रामपंचायतींपैकी 44 ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या उपस्थितीत या सर्व ग्रामपंचायतींच्या ठरावानुसार घोडेगाव तालुका प्रस्तावाला संविधानिक बहुमत प्राप्त झालेले आहे.
विभागीय आयुक्त नाशिक यांच्या निर्देशानुसार तहसीलदार नेवासा यांच्याकडून घोडेगाव तालुका निर्मितीबाबत शासकीय चौकशी पूर्ण झाली आहे. आता शासन निर्देश आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी विभागीय आयुक्तांना लेखी स्वरूपात कळविले आहे. घोडेगाव तालुका प्रस्तावाकामी मंत्रालयस्तरावर आवश्यक पाठपुरावा करणार असल्याचे सुधीर वैरागर यांनी सांगितले.