

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : नेवासा ते नेवासा फाटा दरम्यान तहसीलदार निवासाजवळ शुक्रवारी सायंकाळी झालेल्या गोळीबार व मारहाण प्रकरणातील तिघा आरोपींना नेवासा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने शनिवार (दि.23)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अनिल चव्हाण, मयूर वाघ व ज्ञानेश्वर दहातोंडे (रा. नेवासा फाटा, ता.नेवासा) अशी या आरोपींची नावे आहेत. नेवासा फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी दोघांच्या डोक्यावर बियरच्या बाटलीने मारहाण करून, गावठी कट्ट्यातून तीन फैरी झाडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता.याबाबत आकाश कुसळकर याने दाखल फिर्यादीवरून जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नासह अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस निरीक्षक विजय करे यांनी याप्रकरणी स्वतः तपास करून आरोपी अनिल चव्हाण, मयूर वाघ व ज्ञानेश्वर दहातोंडे या तिघांना प्रवरासंगम येथून अटक केली. एक आरोपी अद्याप फरार आहे.