नगर : पुढारी वृत्तसेवा : 10 हजारापेक्षा अधिक शिक्षकांची आर्थिक नाडी असलेल्या शिक्षक बँकेच्या सत्तेसाठी लाखोंची उड्डाणे सुरू आहेत. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपुर्वीच मेळाव्यांवर लाखोंची उधळपट्टी झाल्यानंतर बँक आणि विकास मंडळाचे अर्जासाठी इच्छुकांकडून 10 हजारांपर्यंत वर्गणी जमा करण्यात आली. अर्ज विक्रीसाठी दोन लाख, अर्जासोबतची अनामत 30 लाख आणि प्रमुख मंडळांनी केलेली 5 लाखांची वर्गणी, अशाप्रकारे निवडणुकीपूर्वीच सुमारे 37 ते 40 लाख रुपये 'गुरुजीं'च्या खिशातून बाहेर आले आहेत.
शिक्षक बँकेची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. सत्ताधारी गुरुमाउली, रोहोकले गुरुजीप्रणित गुरुमाउली, गुरुकुल, सदिच्छा, ऐक्य, शिक्षक भारती, स्वराज्य, इब्टा अशा अनेक संघटनांनी जोरबैठका सुरू केल्या आहेत. निवडणुकीची पूर्वतयारी मेळावे, बैठका, जेवणावळी, शक्तिप्रदर्शन झाल्याचेही दिसून आले. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेतही पॅनल प्रमुखांनी इच्छुकांकडून 7 ते 10 हजार रुपयांची वर्गणी जमा केली. याच पैशातून शिक्षक बँकेची 2 हजार आणि विकास मंडळाची तीन हजारांची अनामत रक्कम, किरकोळ खर्च करण्यात आला आहे.
शिक्षक बँकेसाठी जनरल आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी 2 हजार रुपये अनामत रक्कम आहे. तसेच अनुसूचित जाती व जमाती उमेदवारांसाठी 500 रुपयांची अनामत रक्कम आहे. दरम्यान, अर्ज माघारी घेतलेल्या इच्छुकांची अनामत रक्कम ही निवडणूक संपल्यानंतर त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती सहकार विभागाचे देविदास घोडेचोर यांनी सांगितले आहे.
शिक्षक बँकेच्या उमेदवारी अर्जाची किंमत 100 रुपये होती. 1266 उमेदवारी अर्जांची विक्री झाली. निव्वळ अर्ज विक्रीतून 1 लाख 26 हजार 600 रुपये निवडणूक विभागाकडे जमा झाले आहेत.
विकास मंडळासाठी अनामत नव्हे, तर देणगी म्हणून प्रत्येक इच्छुकांकडून 3000 रुपयांची रक्कम उमेदवारी अर्जासोबत भरून घेतली जाते. यात जे उमेदवार माघार घेतील, त्यांच्या त्या 3 हजारांच्या रक्कमेत आणखी 7 हजारांची भर टाकून त्यांची एकूण 10 हजारांची ठेव करण्याचे नियोजन होणार आहे, असे असले तरी उमेदवारी अर्ज भरतेवेळी 503 उमेदवारांनी प्रत्येकी 3 हजारांप्रमाणे 15 लाख 9 हजार रुपये जमा केले आहेत. याशिवाय 700 पेक्षा अधिक अर्ज विक्री झाली असल्याचे समजते. त्यामुळे यामधूनही 70 हजारांची रक्कम विकास मंडळाच्या तिजोरीत जमा झाली आहे. अशाप्रकारे विकास मंडळासाठीही सुमारे 15 लाखांहून अधिक उलाढाल झाली आहे.
शिक्षक बँकेसाठी 852 अर्ज दाखल झाले होते. यामध्ये अनुसूचित जाती व जमाती या प्रवर्गातून 130 अर्ज आले आहेत. त्यापोटी 500 रुपयांप्रमाणे 65 हजार रुपये अनामत रक्कम जमा झाली आहे. तसेच, सर्वसाधारण, इतर मागासवर्गीय, महिला राखीव व नगरपालिका कॅन्टोंन्मेंट मतदारसंघातून 722 अर्जातून 14 लाख 44 हजारांची अनामत रक्कम जमा झाली आहे.