

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना केंद्रसरकारने 'ईडी' च्या मदतीने बदनाम करण्याचे काम सुरू केले आहे. देशासाठी सदैव समर्पित असणार्या गांधी परिवारावर सूडबुद्धीने केलेली 'ईडी' ची कारवाई आणि देशात मोदी सरकारच्या सुरू असलेल्या हुकूमशाही विरोधात माजी उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले व प्रांत अधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे म्हणाले, भाजप सरकार सातत्याने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करीत आहे. मोदी सरकारकडून गांधी परिवाराची बदनामी त्वरित थांबवली पाहिजे. शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले, गांधी परिवाराचे मोठे योगदान भारत देश घडवण्यात आहे, असे असताना केवळ राजकीय हेतू ठेवून गांधी परिवाराची होणारी बदनामी करणे निषेधार्ह आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांनीही श्रीमती सोनिया गांधींना दिलेली ईडी नोटीस दुर्दैवी असल्याचे म्हणत, केंद्रातील मोदी सरकारचा निषेध केला. महाराष्ट्र युवक काँग्रेस सरचिटणीस दीपाली ससाणे म्हणाल्या, श्रीमती सोनियाजींना 'ईडी'ची नोटीस ही लोकशाहीची चिंता वाढवणारी आहे. भाजप सरकारकडून सातत्याने लोकशाहीवर आघात होत आहेत.
यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष संजय छल्लारे, माजी नगरसेवक मुजफ्फर शेख, शशांक रासकर, सुभाष तोरणे, रमजान शहा, रावसाहेब आल्हाट, सरवरअली सय्यद, युनूस पटेल, सुरेश ठुबे, रवी खिल्लारी, सरबजितसिंग चूग, सनी मंडलिक, रितेश एडके, संतोष परदेशी, प्रसाद चौधरी, मंगलसिंग साळुंके आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.